पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर, सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

कोरोनाशी लढण्यासाठी देशात विकसित करण्यात येणाऱ्या तीन लशींच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यासह अहमदाबाद व हैदराबादचा दौरा करुन संबंधित संस्थांचे प्रमुख आणि वैज्ञानिकांशी चर्चा करणार आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाशी लढण्यासाठी देशात विकसित करण्यात येणाऱ्या तीन लशींच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यासह अहमदाबाद व हैदराबादचा दौरा करुन संबंधित संस्थांचे प्रमुख आणि वैज्ञानिकांशी चर्चा करणार आहेत. मोदींच्या दौऱ्याबाबत पंतप्रधान कार्यालयानेही (पीएमओ) पुष्टी दिली आहे. 

पंतप्रधान मोदी हे दिवसभरात अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे असा दौरा करणार आहेत. पुण्याहून ते दिल्लीला परतणार आहेत.  पंतप्रधान मोदी हे पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला भेट देतील आणि ऑक्‍सफर्डच्या सहकार्याने या कंपनीतर्फे बनविण्यात येणाऱ्या कोरोना लशीच्या प्रगतीचा आढावा घेतील. 

अहमदाबाद-हैदराबादला भेट

 पंतप्रधान मोदी हे सकाळी अहमदाबादला जायडस कॅडिलातर्फे विकसित होणाऱ्या झायकोविड लशीच्या चाचण्यांचा आढावा घेतील. त्यानंतर ते हैदराबादला जातील. तेथे भारत बायोटेकच्या प्रयोगशाळेला भेट देतील. ही कंपनी आयसीएमआरच्या सहकार्याने कोव्हॅक्सिन लस विकसित करत आहे. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या प्रगतिपथावर आहेत. हैदराबादनंतर ते पुण्यात जातील.  ‘पीएमओ’ने म्हटले आहे, की भारताने कोविडविरुद्ध लढाईच्या निर्णायक टप्प्यात प्रवेश केला आहे. हे पाहता पंतप्रधान मोदी कोरोना लस विकसित करणाऱ्या देशातील तीनही संस्थांचा दौरा करतील. तेथे ते लशीच्या प्रगतीबाबत वैज्ञानिकांशी चर्चा करतील व लसीकरण, लशीच्या प्रगतीत येणाऱ्या अडचणी यासंदर्भात चर्चा करतील.

अधिक वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा एक देश, एक निवडणूकीचा नारा..

तमिळनाडूला धडकून ‘निवार’ निवळले ;  तीन नागरिक मृत्युमुखी

राजधानी दिल्लीत वाढत्या कोरोनामुळे नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता 

 

संबंधित बातम्या