देशातली पहिली विनाचालक मेट्रो धावण्यास सज्ज ; 28 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घटन

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

देशातील पहिली विनाचालक मेट्रो उद्‍घाटनासाठी सज्ज झाली आहे. दिल्ली मेट्रोच्या १८ व्या वाढदिवशी म्हणजेच आज या सेवेचे उद्‍घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

नवी दिल्ली :  देशातील पहिली विनाचालक मेट्रो उद्‍घाटनासाठी सज्ज झाली आहे. दिल्ली मेट्रोच्या १८ व्या वाढदिवशी म्हणजेच आज या सेवेचे उद्‍घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप होकार कळविण्यात आलेला नाही. मॅजेंटा लाइनवर (जनकपुरी पश्‍चिम- बोटॅनिकल गार्डन) ही मेट्रो धावणार आहे. एन. श्रीधरन यांच्या अथक प्रयत्नांनी साकारलेल्या दिल्ली मेट्रोचे नाव जगभरात झाले आहे. एकूण १० मार्गिकांवर धावणाऱ्या मेट्रोगाड्या दिल्लीच्या वैभवात भर टाकत आहेत. दिल्लीतील ‘डीटीसी’ बससेवा कमालीची बेभरवशाची असल्याचा पूर्वानुभव असल्याने मेट्रोवर अवलंबून राहणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात आहे. कोरोना काळात सुमारे चार महिने बंद असलेली दिल्ली मेट्रो सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाली. शेतकरी आंदोलन जोरात सुरू असलेल्या सीमाभागांतून गुडगाव, नोएडा, गाझियाबादकडे जाणारी मेट्रोसेवाही एखादा अपवाद वगळता सुरू आहे. 

दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा २५ डिसेंबर हा वाढदिवस असतो व वाजपेयींच्याच हस्ते २००२ मध्ये याच दिवशी दिल्ली मेट्रोने आपल्या व्यावसायिक कामकाजाला सुरवात केली होती. वाजपेयी व दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी त्याच दिवशी डीएमआरसी ते शहादरा-तीस हजारी या ८.२ किलोमीटरच्या पहिल्या मेट्रोतून काश्‍मिरी गेट ते तीस हजारी या मार्गावर तिकीट (टोकन) काढून प्रवास केला होता. त्यामुळे भारतातील पहिल्या चालक रहित मेट्रोचेही उद्‍घाटन उद्याच व्हावे यासाठी दिल्ली मेट्रोचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र पीएमओकडून त्यांना पंतप्रधान उद्या येणार की नाही याबद्दल आज दुपारपर्यंत खात्रीलायक माहिती कळलेली नाही.

चालकरहित मेट्रोची तांत्रिक तयारी पूर्ण झाल्याचे दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने (डीएमआरसी) स्पष्ट केले आहे. सध्या सुरुवातीचे काही दिवस या गाड्यांमध्ये चालकही असतील पण, त्यांचे काम फक्त मेट्रोच्या प्रवासावर देखरेख ठेवणे इतकेच असेल. एखाद्या प्रवाशाला काही अडचण आली तर, त्यांच्या मदतीसाठी हे चालक सुरुवातीच्या केबिनमध्ये राहतील.

संबंधित बातम्या