राज्यसभेतील पंतप्रधानांच्या भाषणावर विरोधकांनी उठविली टीकेची झोड 

दैनिक गोमन्तक
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

पंतप्रधान मोदींच्या भाषणावर कॉंग्रेसने जोरदार टीका केली आहे. कायद्यानुसार एमएसपीची हमी मिळायला हवी, असे कॉंग्रेसने म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तीन नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन संपविण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी राज्यसभेत कृषी कायद्याच्या सुधारणेसंदर्भात बोलताना, अजून एक संधी देण्याची विनंती केली आहे. याशिवाय कृषी क्षेत्राला वेगवान व कार्यक्षम करण्याची वेळ आली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळेस म्हणाले. यानंतर पंतप्रधान मोदींच्या भाषणावर कॉंग्रेसने जोरदार टीका केली आहे. कायद्यानुसार एमएसपीची हमी मिळायला हवी, असे कॉंग्रेसने म्हटले आहे. 

केरळमध्ये कोरोनाचा पुन्हा हाहाकार; दोनशे विद्यार्थ्यांना ओढलं जाळ्यात

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करताना, पंतप्रधानांना शेतकरी कशासाठी आंदोलन करीत आहेत हेच माहिती नसल्यामुळे ते  शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याविषयी कसे चर्चा करतील, असे म्हटले आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटरवरून हल्लाबोल करत असताना, संपूर्ण देश हा भारतीय जनता पक्षाच्या शेतकरीविरोधी धोरणाविषयी आणि हेतूंबद्दल परिचित असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय नवीन कृषी कायदे हे राज्यसभेची मर्यादा ओलांडत बनवले असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.  

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कृषी कायद्यासंदर्भात बोलताना, शेतकऱ्यांना एमएसपीवर आधारित कायद्याची हमी हवी असल्याचे सांगितले. याशिवाय नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री आणि समितीचे सदस्य असताना, शेतकऱ्यांना एमएसपीवर आधारित कायद्याची मागणी लिखित मध्ये केली होती. आणि आज ते देशाचे पंतप्रधान असून, मग शेतकऱ्यांना एमएसपीची हमी का दिली जात नसल्याचा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला.    

त्यानंतर, कॉंग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसले असताना आपण गप्प बसू शकत नसल्याचे म्हटले. तसेच 206 शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या वेळेस आपला जीव गमावला असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. त्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून खिळ्यांची चादर उभी करण्यात आली असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी पुढे सांगितले. आणि राष्ट्रपती यांच्या अभिभाषणानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून चर्चा होणे गरजेचे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.      

याशिवाय, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कृषी कायद्यावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या ट्विटरवरून, मोदी सरकारसाठी सैनिक किंवा शेतकरी हे कोणी नसून, उद्योगपती हेच देव असल्याचा सणसणीत टोला लगावला. राहुल गांधी यांनी ट्विट मध्ये, मोदी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात सैनिकांचे पेन्शन कमी केल्याचा मुद्दा उपस्थित करत, हे सरकार सैनिक किंवा शेतकऱ्यांचे नसून, तीन ते चार उद्योगपतींसाठी देव असल्याचे लिहिले आहे.    

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनावरील चर्चेत उत्तर देताना कॉंग्रेसवर निशाणा साधला. देशात आंदोलनकर्त्यांचा नवीन गट जन्माला आला आहे. आणि तो निषेधाशिवाय जगू शकत नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. याशिवाय काही राजकीय पक्ष संसदेत कृषी कायद्यास विरोध करीत आहेत, तर त्यांच्या राज्यात त्यांनी या कायद्यातील काही तरतुदी लागू केल्या असल्याचे पंतप्रधानांनी यावेळेस सांगितले. तसेच कोणीही कृषी कायद्याबद्दल चर्चा केली नसल्याचे म्हणत, हा कायदा संमत केल्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याचे, नरेंद्र मोदी म्हणाले. 

संबंधित बातम्या