रामजन्मभूमिपासून पंतप्रधान दूरच

PTI
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राम मंदिराचे भूमिपूजन केले तेव्हा ते जन्मठिकाणी भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरले.

अयोध्या

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अयोध्येत पंतप्रधान कोणत्या ना कोणत्या निमित्ताने गेले, परंतु जन्मठिकाणापासून ते दूरच राहिल्याचे दिसून येते. गेल्या पाच दशकात इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान या नात्याने अयोध्येत आले, परंतु ते जन्मठिकाणी गेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राम मंदिराचे भूमिपूजन केले तेव्हा ते जन्मठिकाणी भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरले.
तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९६६ रोजी शरयू नदीच्या काठावर बांधण्यात आलेल्या घाटाचे लोकार्पण केले. पण त्या रामजन्मभूमिकडे गेल्या नाहीत. त्यानंतर त्या आचार्य नरेंद्र देव विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी आल्या, त्याही वेळेस मंदिराकडे गेल्या नाहीत.१९७९ रोजी त्या पुन्हा अयोध्येत आल्या आणि या भेटीत त्यांनी हनुमान गढीचे दर्शन घेतले. राजीव गांधी पंतप्रधान असताना दोन वेळेस अयोध्येत आले. १९८४ रोजी लोकसभा निवडणूक प्रचाराची सभा घेतली होती. त्यानंतर १९८९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग त्यांनी फैजाबाद (अयोध्या) येथून फुंकले होते. १९८६ मध्ये जन्मूभूमिचे कुलूप उघडणे आणि नोव्हेंबर १९८९ रोजीच्या भूमिपूजनाच्या कामाचा अप्रत्यक्षपणे राजकीय लाभ मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. तरीही कॉंग्रेसला पराभवाचे तोंड पाहवे लागले होते. त्यानंतर कारसेवकांचे आंदोलन सुरू झालेले असताना राजीव गांधी १९९० रोजी सदभावना यात्रेनिमित्त अयोध्येत आले होते. याही वेळेस ते जन्मभूमिपासून दूरच राहिले. केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाले तेव्हा दोन्ही पंतप्रधान थेट अयोध्येत आले होते. नरेंद्र मोदी यांच्या अगोदर अटलबिहारी वाजपेयी २००३ मध्ये अयोध्येत आले होते. पण त्यांनी मंदिरांच्या अनुष्ठानात थेट सहभागी होण्याऐवजी आंदोलनाचे प्रमुख आणि आघाडीचे महंत रामचंद्र परमहंस यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहिले. या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी शरयू नदीच्या काठावर महंत रामचंद्र परमहंस यांना श्रद्धांजली वाहताना मंदिर उभारण्याची घोषणा केली.

संपादन- अवित बगळे

 

संबंधित बातम्या