प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रामुळे औषध खरेदी झाली सुलभ

Pib
मंगळवार, 5 मे 2020

देशाच्या अतिदुर्गम भागात या औषधांचा पुरवठा करण्यासाठी भारतीय टपाल सेवेची देखील मदत घेतली जात आहे.

नवी दिल्ली,

कोरोना विषाणू संसर्गामुळे देशभर संपूर्ण बंदी लागू असल्यामुळे रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रे व्हॉट्अप आणि ई मेल द्वारे औषधांच्या ऑर्डर्स स्वीकारत आहेत. अधिकृत डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांची यादी या समाजमाध्यमांद्वारे केंद्रांकडे पाठविल्यानंतर रुग्णांच्या घरापर्यंत आवश्यक औषधे पोहोचविली जात आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून सुरु केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे नागरिकांना हवी असणारी औषधे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची हमी मिळाली आहे. प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांनी सुरु केलेल्या या नव्या उपक्रमाचे केंद्रीय रसायने आणि खते विभागाचे मंत्री सदानंद गौडा यांनी कौतुक केले आहे. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना कमीत कमी वेळात आवश्यक औषधांच्या वितरणाची सेवा देण्यासाठी अनेक भारतीय जनौषधी केंद्रे व्हॉट्अप आणि ई मेल सारख्या समाजमाध्यमांसह दळणवळणाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत हे खरोखरीच उत्साहवर्धक पाऊल आहे असे ते म्हणाले.

भारतीय जनौषधी केंद्रे प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेअन्तर्गत काम करीत असून जनतेला उत्तम दर्जाची औषधे परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी सध्या देशातील 726 जिल्ह्यांमध्ये 6300 पेक्षा जास्त जनौषधी केंद्रे कार्यरत आहेत. ह्या केंद्रांवर मिळणारी औषधे इतर दुकानांमध्ये मिळणाऱ्या औषधांपेक्षा 50 ते 90 % स्वस्त आहेत. गेल्या महिन्याभरात या केंद्रांनी देशात 52 कोटी रुपयांच्या औषधांचा पुरवठा केला.

देशाच्या अतिदुर्गम भागात या औषधांचा पुरवठा करण्यासाठी भारतीय टपाल सेवेची देखील मदत घेतली जात आहे.

तसेच रसायने आणि खते मंत्रालयाच्या औषध विभागाच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या बीपीपीआय अर्थात भारतातील सार्वजनिक उपक्रमांतर्गत चालणाऱ्या औषध कंपन्यांच्या मंडळाने त्यांच्या पुरवठादारांच्या कच्चा माल आणि वाहतूकविषयक समस्या सोडविण्यासाठी त्यांची बिले विहित मुदतीआधीच चुकती केली आहेत.

देशभरातील संपूर्ण बंदी कालावधीत औषधांच्या पुरवठ्याच्या बाबतीत उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्रपणे समर्पित असलेली बीपीपीआयच्या अधिकाऱ्यांच्या गटाची नियुक्ती करण्यात आली आहे.

जन औषधी गोदामांतील कामकाज पूर्ण क्षमतेने सुरु असून तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे.ग्राहक आणि जन औषधी केंद्रांचे संचालक यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बीपीपीआयचे हेल्पलाईन क्रमांक चोवीस तास उपलब्ध आहेत.

 

बंदी कालावधीत औषधांचा औषधांचा अखंडित पुरवठा सुरु राहण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बीपीपीआयने गेल्या महिन्यात 186 कोटी 52 लाख रुपयांच्या औषधांच्या खरेदीची ऑर्डर दिली होती.

 

 

संबंधित बातम्या