एका युगाचा अंत

Prithviraj Chavan on Pranab Mukherjee
Prithviraj Chavan on Pranab Mukherjee

प्रणव मुखर्जी वयाच्या ३५ व्या वर्षी राज्यसभेवर निवडून आले व १९७३ मध्ये ते राज्यमंत्री झाले. १९९१ मध्ये मी पहिल्यांदा खासदार झालो, तेव्हापासून ते २०१० पर्यंतच्या दिल्लीच्या वास्तव्यात प्रणवदांची कारकीर्द अगदी जवळून पाहता आली आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी देखील मिळाली. मला खूप काही शिकता आले. 

काँग्रेसला १९९१ च्या निवडणुकीत कामचलाऊ बहुमत मिळाले होते. पण प्रधानमंत्री कोण होणार याबद्दल स्पष्टता नव्हती. अचानक नरसिंह राव पंतप्रधान झाले. मंत्रिमंडळ तयार करताना नरसिंह राव यांनी आपल्या मित्राचा म्हणजेच प्रणवदांचा सल्ला घेतला. प्रणवदा अर्थमंत्री होतील अशी सर्वांना खात्री होती. परंतु अचानक अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव जाहीर झाले. नरसिंह राव यांनी प्रणवदांना योजना आयोगाचे उपाध्यक्ष करण्याचे ठरवले. हे ऐकून प्रणवदांना धक्का बसला. प्रणवदा यांनी पंतप्रधान नरसिंहराव यांना मी विचार करून सांगतो, असे सांगितले. त्यावर नरसिंहराव म्हणाले की, ‘तुम्हाला जितका वेळ विचार करायचा तेवढा करा, पण सोमवारी कामावर रुजू व्हा’. 

मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकाचे होते. ते ९० पेक्षा अधिक मंत्री गटाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अनेक मंत्री गटामध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. त्यामध्ये एन्रॉन कर्जमाफी, जागतिक व्यापार संघ, विमान खरेदी, निर्गुंतवणुकीकरण असे अनेक महत्त्वाचे निर्णय झाले.  प्रणवदा यांनी इंदिरा गांधी, नरसिंह राव व डॉ. मनमोहन सिंग या तीन पंतप्रधानांच्या हाताखाली काम केले. इंदिरा गांधी व मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते अर्थमंत्री होते. याच काळात त्यांनी आयात-निर्यातीसाठी एक्झिम बँक, कृषी आणि ग्रामीण पतपुरवठ्यासाठी नाबार्ड अशा महत्त्वाच्या वित्तीय संस्था स्थापन केल्या. २००८ मध्ये अमेरिकेतील आर्थिक मंदीची झळ लागू नये यासाठी त्यांनी अचूक निर्णय घेतले.

प्रणवदांचे एका शब्दात वर्णन करावयाचे असेल तर ते ‘चिवट’ या शब्दात करता येईल. राजकीय आयुष्यात कितीही चढ-उतार आले तरीही ते त्यातून तावून सुलाखून बाहेर पडले. मी काँग्रेसचा सरचिटणीस असताना पक्षाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी रात्री आठनंतर ते घरी बोलवत व अनेकदा चर्चा दोन-दोन तास चालत असत. त्यांच्या कडून खूप शिकता आले.

प्रणवदा राष्ट्रपती असताना २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारशी संघर्ष टाळला. पण त्याचबरोबर त्यांनी वेळोवेळी असहिष्णुता, संसदीय चर्चेचा दर्जा तसेच घटनेचे व लोकशाहीची मूल्ये जपण्याचे आवाहन देखील केले. त्यामुळे ते ‘रबर स्टॅम्प’ राष्ट्रपती ठरले नाहीत. त्यांच्या  निधनाने भारतीय राजकारणातील एका युगाचा अंत झाला आहे. 

‘मुख्यमंत्रिपदाच्या निवडीत महत्त्वाची भूमिका’
नोव्हेंबर २०१० मध्ये महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यावर सोनिया गांधी यांनी नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी प्रणवदा व ए. के. अँटोनी यांना निरीक्षक म्हणून पाठविले होते. त्याच रात्री ३ वाजता सोनिया गांधी यांनी मला फोन करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारण्यास सांगितले. माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीमध्ये प्रणवदांची महत्त्वाची भूमिका होती.

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com