काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. प्रियांका गांधी वाड्रा यांनी काँग्रेसच्या बिजनौर येथील सभेत मोदी सरकारवर निशाणा साधला असून, कधी कधी नरेंद्र मोदी यांना जनतेने दोन वेळा का निवडून दिले असा प्रश्न पडत असल्याचे म्हटले आहे. तसेच नवीन कृषी कायद्याला शेतकऱ्यांचाच विरोध असल्याने सरकार हे कायदे जबरदस्तीने का थोपवत असल्याचे प्रियांका गांधी वाड्रा यांनी यावेळेस म्हटले आहे.
केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील दोन महिन्यांच्या पेक्षा अधिक काळाहून आंदोलन करत आहेत. आणि याच मुद्दयावर प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. प्रियांका गांधी वाड्रा यांनी बिजनौर येथील सभेला संबोधित करताना, शेतकऱ्यांचे इनकम डबल झाले आहे का? असा प्रतिप्रश्न विचारला. तसेच 2017 पासून शेतातील उसाच्या किमतीत वाढ झाली नसल्याचे सांगत, उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मागील काही काळापासून 10,000 कोटी रुपये थकीत असल्याचे प्रियांका गांधी वाड्रा यांनी यावेळी सांगितले. तर हीच संपूर्ण देशभरातील थकबाकी 15,000 कोटी रुपये असल्याचे त्या पुढे म्हणाल्या. त्यामुळे मुख्यत्वेकरून उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीच देणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले नसल्याचा आरोप प्रियांका गांधी वाड्रा यांनी यावेळी केला.
प्रायव्हसी पॉलिसीवरून सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सअॅप,फेसबुकला फटकारले
यानंतर प्रियांका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, कधी कधी जनतेने त्यांना दुसऱ्यांदा का निवडून दिले असा प्रश्न पडत असल्याचे त्या म्हणाल्या. आणि कदाचित जनतेला नरेंद्र मोदी यांच्याकडून आशा आणि विश्वास असल्यानेच त्यांनी पुन्हा निवडून दिले असावे, असे प्रियांका गांधी वाड्रा पुढे म्हणाल्या. मात्र पहिल्या निवडणुकीच्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरीच आश्वासने दिली होती. व यातील काहीच पूर्ण झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवेळेस देखील नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, बेरोजगारी आणि अन्य विषयांवर भाष्य केले. परंतु पुढे काय झाले? असे प्रियांका गांधी वाड्रा यांनी यावेळी विचारले.
याव्यतिरिक्त, केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागील 80 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. ते थंडीत देखील याच ठिकाणी होते आणि आता उन्हाळा येत असल्याचे सांगत, केंद्र सरकार या विषयावर गंभीर नसल्याची टीका प्रियांका गांधी वाड्रा यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्याच फायद्याचे असल्याचे बोलत आहेत. तर शेतकऱ्यांसाठीच बनवण्यात आलेले कायदे त्यांना नको असल्याने सरकार ते मागे का घेत नाही, असा सवाल प्रियांका गांधी वाड्रा यांनी केला आहे.