मलनिस्सारण प्रकल्पाचा खर्च पोचला १५२ कोटी ७२ लाखावर तरी हा प्रकल्प अपूर्ण...

मलनिस्सारण प्रकल्पाचा खर्च पोचला १५२ कोटी ७२ लाखावर तरी हा प्रकल्प अपूर्ण...
The project will take another seven months to complete


 म्हापसा : म्हापसा शहरासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जायका) बरोबर करार करून सुरुवातीच्या काळात ८० कोटी रुपये खर्चून मलनिस्सारण प्रकल्प मार्गी लावला. आता सात वर्षे उलटली हा प्रकल्प पूर्ण होत नाही. पण या मलनिस्सारण प्रकल्पाचा खर्च पोचला १५२ कोटी ७२ लाखावर तरी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारला लागणार आणखी सात महिन्याचा काळ. एप्रिल २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर व तत्कालीन उपमुख्यमंत्री व म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसौजा यांनी या कामाचा शुभारंभ केला होता. ३५ किलोमीटर अंतराचा हा मलनिस्सारण प्रकल्प मार्गी लागला. या प्रकल्पाचे कंत्राट सिम्प्लेक्‍स इन्फ्रास्ट्रक्‍चर या कंपनीला मिळाले होते. २०१५ मध्ये काम पूर्ण करण्याचे ठरले होते. ३६ महिन्यांच्या काळात काम पूर्ण करणे या कंपनीला शक्‍य झाले नाही.


मलनिस्सारण प्रकल्प हा म्हापसा मतदारसंघासाठी पहिला टप्पा होता यामध्ये कामरखाजन, गावसवाडा, आंगड, मरड, दत्तवाडी, अन्साभाट, केणीवाडा, सिरसाटवाडा,विठ्ठलवाडी, पोलिसस्थानक परिसर, संपूर्ण खोर्लीचा भाग,फेअर बायश, न्यायालय परिसर या भागाचा समावेश होता. या संपूर्ण भागातील पाईपलाईन घालण्यासाठी ३५ किलोमीटरचे बांधकाम केले गेले. १४२९ टाक्‍या घातल्या. तर १४५० पाहणी चेंबर उभारले गेले आहेत. हा प्रकल्प २०१५ मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र मलनिस्सारण प्रकल्पाचे काम करताना या कंपनीला म्हापसा शहरातील खाजन जमिनीचा अंदाज आला नाही तसेच दत्तवाडी किंवा न्यायालय परिसर हा महत्वाचा भाग अाहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी तयार झाल्या होत्या.


२०१२ मध्ये काम चालू झाले तेव्हा आर्थिक व्यवहार हा जायका व कंत्राटदार सिम्प्लेक्‍स कंपनीबरोबर परस्पर होत होता. तोपर्यंत काम युध्दपातळीवर सुरू होते. त्यानंतर सरकारने एका आदेशाद्वारे जायका कंपनीने ही रक्कम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठवण्यास सांगितली.
सरकारने हा म्हापसा मतदारसंघातील मलनिस्सारण प्रकल्पाचे बांधकाम पारदर्शी पध्दतीने केले असते तर तो वेळेवर पूर्ण झाला असता पण सिम्पलेक्‍स इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा.लि. कंपनीला वेळेवर कामाची बिले मिळत नसल्यामुळे काम रखडत गेले. मागच्या पाच वर्षात राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक बनत असल्यामुळे जायकाचा निधी सार्वजनिक बांधकाम खाते इतरत्र वळवत होते.
१५२.७२ लाख रूपयाचा हा मलनिस्सारण प्रकल्प मार्गी लावण्यास म्हापशाचा आमदाराना सत्तेत असूनसुध्दा अपयश आले. ३५ किलोमीटरची पाईपलाईन घालून शहरातील सर्व मलनिस्सारण कामखाजन येथे उभारण्यात आलेल्या मलनिस्सारण प्रकल्पात शुध्दीकरण होणार होते. 


कामरखाजन येथे मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्याससुध्दा सिम्पलेक्‍स कंपनीला पाच वर्षाचा काळ लागला होता.  काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पावसाळ्यात या टाक्‍यामध्ये पाणी घुसून पाणी टाकीतून वाहत असते. तसेच मॅनहॉलच्या बाजूला अनेक खड्डे तयार झाले आहेत. कामाचा दर्जा पाहिल्यास भविष्यात हा प्रकल्प व्यवस्थित मार्गी लागणार का? असा प्रश्‍न म्हापसेंकरांना पडला आहे.


मागच्या ऑक्‍टोबर 2020 या महिन्यात म्हापसा पालिका मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यानंतर आमदार ज्योशुआ डिसौजा यांनी गोवा सिव्हरेज कॉर्पोरेशनचे अभियंते यांची नगरसेवकासमवेत बैठक घेऊन चर्चा केली होती. मागच्या आठ महिन्यापासून कोविड १९ मुळे काम रेंगाळत गेले होते. हा प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी आमदार ज्योशुआ डिसौजा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या मतानुसार हा प्रकल्प मे 2020पर्यंत पूर्ण करून सर्व घराना या प्रकल्पासाठी जोडणी घेण्यासाठी ५० कोटी रुपयाची निविदा काढली गेली आहे.  कामरखाजन येथील मलनिस्सार प्रक्रिया प्रकल्पात (एस.टी.पी.)ची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर सिव्हरेज कॉर्पोरेशन (जी एस एस डी सी) सर्व घराना जोडणी देणार आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com