आंदोलक शेतकऱ्यांकडून ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक

गोमन्तक वृत्तसंस्था
शनिवार, 5 डिसेंबर 2020

 केंद्राचे तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याने ते तिन्ही संपूर्ण रद्द करावेत, या मागणीवर ठाम असलेल्या शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहे.

नवी दिल्ली  :   केंद्राचे तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याने ते तिन्ही संपूर्ण रद्द करावेत, या मागणीवर ठाम असलेल्या शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहे. अखिल भारतीय शेतकरी संघर्ष कृती समितीने आजच्या तिसऱ्या टप्प्यातील चर्चेच्या पूर्वसंध्येला आजच्या बैठकीनंतर ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. उद्याच्या बैठकीतही सरकारचे प्रतिनिधी कायदे दुरुस्तीवरच अडून राहिले तर आंदोलनाची व्याप्ती प्रचंड वाढविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. देशभरातील मालवाहतूकदारांनीही ८ तारखेपासून बेमुदत संपाची हाक दिली.

दरम्यान, या आंदोलनाच्या ९ व्या दिवशीही आंदोलकांची संख्या सतत वाढत आहे. गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांतील अनेक शेतकरीही आंदोलनस्थळी दाखल होत आहेत. टीकरी, सिंघू, चिल्ला, नोएडा, गाझियाबाद, सिरहोल आदी ९ ते १० सीमा वाहतूक पोलिसांनी बंद केल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी आता लोखंडी अडथळ्यांबरोबरच सिमेंट कॉंक्रीटचेही अडथळे उभे केले आहेत. जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर त्यांची संख्या अधिक आहे. यामुळे अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. 

 

पंतप्रधानांना पत्रे

अखिल भारतीय शेतकरी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुरेंद्र सोळंकी यांनी सांगितले, की सरकारने तिन्ही कायदे मागे घ्यावेत. याबाबत पंतप्रधानांना पत्रे लिहिली. संघटनेतर्फे आज देशव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

साहित्यिकांचीपुरस्कार वापसी 

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून विख्यात लेखक डॉ. मोहनजीत, विचारक डॉ. जसविंदर व पत्रकार स्वराजबीर यांनी आपापले साहित्य अकादमी पुरस्कार आज परत केले. येत्या काही दिवसांत आणखी काही क्रीडापटू व लष्करात शौर्यपदके मिळविणारे जवानही पुरस्कार परत करतील असे सांगण्यात येत आहे.

 

शेतकऱ्यांचे आंदोलन जनआंदोलन बनले

शेतकऱ्यांचे हे आंदोलन जनआंदोलन बनल्याचे सांगताना योगेंद्र यादव म्हणाले, की ८ तारखेनंतर एक विशिष्ट दिवस शेतकरी नेते निश्‍चित करतील ज्या दिवशी देशातील सारे टोलनाके मुक्त केले जातील. सरकारने उद्याच्या चर्चेत पुन्हा कायदा दुरुस्त्यांचा आग्रह धरला तर उद्या शेतकरी नेते त्याच क्षणी चर्चा थांबवतील असे हन्नन मौला यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांचा जनता कर्फ्यू

आंदोलक संघटनांच्या नेत्यांनी आज सिंघू सीमेवर बैठक घेऊन पुढची रणनीती व सरकारबरोबर उद्याच्या बैठकीतील मुद्यांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी, अंबानी व अदानी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे उद्या (ता. ५) दहन करण्यात येईल व ८ तारखेला भारत बंद म्हणजेच ‘शेतकऱ्याचा जनता कर्फ्यू’ पुकारण्यात येईल, असे आज ठरविण्यात आले.

 

दुरुस्ती नको, रद्द करा

भारतीय किसान युनियनचे (लाखोवाल) महासचिव एच एस लाखोवाल यांनी सांगितले, की सरकारकडून उद्या पुन्हा कायदा दुरुस्ती हा शब्द आम्हाला ऐकायचा नाही. हे तीनही कायदे रद्दच झाले पाहिजेत. त्याशिवाय चर्चा पुढे जाणार नाही. भारतीय किसान महासंघाचे नेते राकेश टिकैत म्हणाले, की आम्हाला आंदोलन जास्त ताणायचे नाही. पण सरकारने ताठर भूमिका बदलली पाहिजे. उद्याच्या चर्चेवरच याचाही निर्णय होईल की यापुढील चर्चांमध्ये सहभागी व्हायचे की नाही. 

 

अधिक वाचा :

गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सोहळ्यासाठी राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

 

संबंधित बातम्या