प्रजासत्ताकदिनी राजपथावर जवानांनंतर शेतकऱ्यांचे ‘संचलन’

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

राजपथावर प्रजासत्ताक दिनाचे संचलन झाल्यानंतर ट्रॅक्टर संचलनाला सुरवात होईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर ठाम असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांना आज अखेर ट्रॅक्टर संचलनाला पोलिसांची परवानगी मिळाली आहे. राजपथावर प्रजासत्ताक दिनाचे संचलन झाल्यानंतर ट्रॅक्टर संचलनाला सुरवात होईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. मात्र, यानिमित्ताने दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी गटांचे ट्रॅक्टर मोर्चावर विशेष लक्ष असल्याचा इशाराही दिल्ली पोलिसांनी दिला आहे. यासाठी सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षतेचेही आदेश देण्यात आले आहेत. 

अयोध्येतील राम मंदिराचा खर्च तब्बल 1,100 कोटी रुपये - 

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी संघटना ठाम असून प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर संचलनातून शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या आऊटर रिंगरोडवर संचलनाच्या परवानगीची मागणी केली होती. परंतु पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत इन्कार केल्यानंतर सिंघू, टिकरी आणि गाजीपूर अशा तीन सीमांवरून हे संचलन सुरु होऊन त्याच ठिकाणी परत येण्यास होकार मिळाला आहे. ट्रॅक्टर संचलनासंदर्भात पोलिसांशी झालेल्या वाटाघाटीनंतर संयुक्त किसान मोर्चाचा प्रमुख चेहरा व स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी पत्रकारांशी बोलताना पोलिसांकडून ट्रॅक्टर संचलनाला परवानगी मिळाल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर संचलन पूर्णपणे शांततेत असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पाककडून उपद्रव शक्य 
प्रजासत्ताक दिन सोहळ्यात अडथळे येऊ नये यावर शेतकरी संघटना सहमत असल्याचे दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी सांगितले. दिल्लीमध्ये ट्रॅक्टर संचलनाचा 100 किलोमीटरपेक्षा अधिक मार्ग असेल. या शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या निमित्ताने पाकिस्तानचा भारतात उपद्रव घडविण्याचा प्रयत्न आहे, असाही दावा त्यांनी केला. ट्रॅक्टर संचलनाशी संबंधित एकूण ट्विटर हँडलपैकी 308 ट्विटर हँडल पाकिस्तानातील असल्याचे आढळून आले असून पाकिस्तानातील दहशतवादी गटांचीही या ट्रॅक्टर संचलनावर नजर आहे. 

संबंधित बातम्या