पुलवामा: हल्ल्याचा कट पाकिस्तानातच

पीटीआय
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

‘पुलवामा’बाबत ‘एनआयए’ची आरोपपत्रात माहिती

नवी दिल्ली: मागील वर्षी पुलवामा जिल्ह्यात निमलष्करी दलाच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला घडविण्यासाठी दहशतवाद्यांनी ५.७ लाख रुपये एवढा खर्च केला होता, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिली आहे.

‘एनआयए’ने आरोपपत्र सादर केले असून त्यामध्ये  जैशे मोहंमद ही दहशतवादी संघटना आणि तिचा म्होरक्या मोहंमद उमर फारूख यांच्यावर ठपका ठेवला आहे. फारूख हा कुख्यात दहशतवादी मसूद अझहर याचा नातेवाईक आहे.

हल्ल्याचा कट पाकिस्तानातच शिजला होता, त्यासाठीची दहा लाख रुपये एवढी रक्कम मागील वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या काळामध्ये पाच टप्प्यांमध्ये भारतात आली होती. ही रक्कम फारूखच्या अलाईड आणि मिझान या बँकांच्या खात्यावर जमा झाली होती. फारूखने रौफ असगर अल्वी आणि अम्मार अल्वी या दोघांकडून हे पैसे मागविले होते. या पैशांचा नेमका कसा वापर झालाा याची   चौकशी सुरु आहे.

आधीच घुसखोरी
या दहशतवाद्यांनी चार किलो एवढे ॲल्युमिनियम हे श्रीनगरमधील दहशतवादी वैज-उल-इस्लाम याच्या घरातून मिळवले होते. सुरक्षा दलांनी त्याला अटक केली आहे. या आरोपपत्रामध्ये जैश-ए- मोहंमद संघटनेने २०१८-१९ या काळात घुसखोरीसाठी कोणत्या मार्गांचा अवलंब केला त्याची माहिती दिली आहे. यातील पाच दहशतवाद्यांना जम्मूच्या सांबा सेक्टरमधून काश्‍मीरमध्ये आणण्याचे काम  इकबाल राठेर याने केले होते.

‘एफबीआय’ची मदत
पुलवामामधील हल्ल्यानंतर जैशच्या दहशतवाद्यांनी पाठविलेले मेसेज ट्रॅक करण्यासाठी एनआयएने अमेरिकीची तपाससंस्था (फेडरल  ब्युरो ऑफ इनव्हेस्टीगेशन) देखील मदत घेतली होती.

गाडीमध्ये सुधारणा केल्या
हा पैसा भारतात आणण्यासाठी दहशतवाद्यांनी आर्थिक देवाणघेवाणीचा पारंपरिक मार्ग टाळत, विविध ठिकाणांवरून हा पैसा बँक खात्यांमध्ये जमा केल्याचे उघड झाले आहे. कोठे हवाला मार्गाचा वापर झालेला नाही ना? याचा देखील शोध सुुरू आहे. आरोपपत्रानुसार हल्ला घडविण्यासाठी  दहशतवाद्यांनी १.८५ लाख रुपयांना मारुती इको व्हॅन विकत घेतली. या गाडीतून स्फोटके वाहून नेणे सोपे व्हावे म्हणून तिच्यात काही तांत्रिक सुधारणा करण्यासाठी ३५ हजार रुपये एवढा खर्च आला होता.

संबंधित बातम्या