धारवाडहून गोव्याला निघालेल्या पर्यटकांचा अपघात ; 11 जण जागीच ठार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

धारवाडहून गोव्याला जाताना पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर  मिनी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाला.

धारवाड : धारवाडहून गोव्याला जाताना पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर  मिनी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर काही प्रवासी जखमी झाले आहेत.

एक मिनी बस दावणगिरीच्या पर्यटकांना घेऊन गोव्याला जात होती. धारवाडजवळ समोरून येणारा ट्रक मिनी बसला अचानक येऊन धडकला. ही घटना आज सकाळी घडली आहे. जखमींना धारवाड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. दावणगिरी येथून काही पर्यटक मिनी बसने गोव्याला जात होते.  अपघात इतका भीषण होता की मिनी बस उडून लांब जाऊन पडली. या अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला.

घटना समजताच हायवे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना धारवाड येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. जखमींपैकी काही अद्याप गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर बायपास महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. महामार्गावरील अपघाग्रस्त गाड्या हटवण्याचे काम सुरू आहे.

पुणे - बेंगळुरू दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर हुबळी-धारवाड बायपासचा 32 कि.मी. लांबीचा एकल मार्ग आहे. मुंबई आणि चेन्नई औद्योगिक कॉरिडॉर दरम्यानचा हा एकमेव मार्ग असून इथं अनेक अपघात झाले आहेत. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, रस्ता रुंदीकरणाची बराच काळ मागणी आहे, परंतु अद्याप तसे झाले नाही.

संबंधित बातम्या