पंजाबमध्ये शस्त्र परवान्यासाठी ट्री फॉर गन उपक्रम

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

शस्त्र परवाना नव्याने हवा असेल तर दहा रोपट्यांची आणि परवाना नुतनीकरण करायचा असेल तर पाच रोपट्यांची लागवड करावी लागणार आहे. वृक्षारोपण करतानाचे फोटो देखील परवान्याच्या फाइलला जोडावे लागणार आहेत.

लुधियाना: नव्याने शस्त्र परवाना हवा असेल किंवा परवान्याचे नुतनीकरण करायचे असेल तर वृक्षारोपण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लुधियानाचे विभागीय आयुक्त चंदर गैंद यांनी ‘ट्री फॉर गन’ ही योजना कार्यान्वित केली आहे. अशा प्रकारची योजना राबवणारे लुधियाना पंजाबमधील चौथे शहर बनले आहे. त्यांनी यापूर्वी फिरोजपूर, पतियाळा आणि संगरुर शहरात योजना राबविली आहे. विशेष म्हणजे झाडे लावल्याचे पुरावे देखील प्रशासनाला द्यावे लागणार आहे. पुरावे दिल्यानंतरच परवान्याची फाइल हलणार आहे. 

शस्त्र परवाना नव्याने हवा असेल तर दहा रोपट्यांची आणि परवाना नुतनीकरण करायचा असेल तर पाच रोपट्यांची लागवड करावी लागणार आहे. वृक्षारोपण करतानाचे फोटो देखील परवान्याच्या फाइलला जोडावे लागणार आहेत. एक महिन्यानंतर पुन्हा झाडांची स्थिती कळवावी लागणार आहे. त्यानंतरच अर्जदाराची फाइल मंजूर होण्याचा मार्ग मोकळा होईल. एक महिन्यानंतर झाडांची स्थिती समजल्यानंतर अर्जदाराची डोप टेस्ट, पोलिस पडताळणी आणि अन्य कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाईल. चंदर गैंद म्हणाले, की सध्या पर्यावरणाची स्थिती चिंताजनक बनली आहे. झाडांची कत्तल होत आहे. पाण्याची पातळी देखील घसरत चालली आहे. पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी त्यांनी फिरोजपूर जिल्ह्यातून सुरवात केली होती. या योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहून पतियाळा आणि संगरुर जिल्ह्यातही त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या