केंद्र सरकार विरूद्ध थोपटले पंजाबने दंड

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

शिरोमणी अकाली दल, आम आदमी पक्ष आणि लोक इन्साफ पक्ष या विरोधी पक्षांनीही या विधेयकांना पाठिंबा दिला. विशेष म्हणजे, भाजपने मात्र आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता.

चंडीगड- केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध म्हणून चार विधेयके आज पंजाबच्या विधिमंडळात मंजूर करण्यात आली. मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी आज विधिमंडळात याबाबतचा ठराव सादर केला. या विधेयकांवर विधिमंडळात तब्बल चार तास चर्चा चालली. शिरोमणी अकाली दल, आम आदमी पक्ष आणि लोक इन्साफ पक्ष या विरोधी पक्षांनीही या विधेयकांना पाठिंबा दिला. विशेष म्हणजे, भाजपने मात्र आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता.

कृषी उत्पादन सुलभीकरण कायदा, शेतकरी करार आणि कृषी सेवा कायदा, जीवनावश्‍यक वस्तू कायदा आणि दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी या विधेयकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी सांगितले की, आज संमत करण्यात आलेल्या ठरावाच्या प्रती आम्ही राज्यपालांनाही दिल्या आहेत. आम्ही त्यांची मान्यता घेणार आहोत. कृषी विधेयके संसदेमध्ये मंजूर करण्यात आली असल्याने त्यांचे आता कायद्यामध्ये रूपांतर झाले आहे पण आमच्या विधानसभेने हे कायदे नाकारले आहेत. राज्यपालांनी आमच्या विधेयकांना मान्यता दिली नाही तर आम्ही याविरोधा न्यायालयाचे दार ठोठावू. राज्यातील शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी हा ठराव मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या