यूपीत ‘बसप’ला धक्का; सहा आमदार फुटले

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीमुळे शह-काटशहचे राजकारण रंगले असताना या रस्सीखेचीत बहुजन समाज पक्षाला (बसप) मोठा धक्का बसला आहे. 
पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून रामजी गौतम यांचे नाव पुढे करणाऱ्या बसपच्या दहापैकी सहा आमदारांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीमुळे शह-काटशहचे राजकारण रंगले असताना या रस्सीखेचीत बहुजन समाज पक्षाला (बसप) मोठा धक्का बसला आहे. 
पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून रामजी गौतम यांचे नाव पुढे करणाऱ्या बसपच्या दहापैकी सहा आमदारांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला आहे. मूळ पाठिंब्याच्या पत्रावरील आमच्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भातील पत्रदेखील त्यांनी विधानसभेच्या सचिवालयाकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. आता हे बसपचे सहाही आमदार पक्ष बदलण्याची शक्यता आहे.

मायावतींनी पुढे केले नाव
काही दिवसांपूर्वी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पक्षाचे बिहार प्रभारी आणि राष्ट्रीय समन्वयक रामजी गौतम यांचे नाव राज्यसभेसाठी पुढे केले होते. अन्य भाजपविरोधी मतांच्या बळावर आपण निवडून येऊ असा विश्‍वास गौतम यांनी व्यक्त केला होता. पण ऐनवेळी गणित बदलले. उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या दहा जागांसाठी मतदान होत असून, भाजपच्या आठ उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दोनच दिवसांपूर्वी गौतम यांनी पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी  अर्ज भरला होता, त्यानंतर आज सहाही आमदारांनी त्यांचा पाठिंबा मागे घेतला आहे. यामध्ये अस्लम रैनी, अस्लम चौधरी,  मुज्तबा सिद्दीकी, हकीम लाल बिंद आणि हरगोविंद भार्गव यांचा समावेश आहे. दरम्यान राज्यसभेसाठी सादर करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची ९ नोव्हेंबर रोजी पडताळणी होणार आहे. 

संबंधित बातम्या