महाराष्ट्रातून आलेल्यांसाठी संस्थात्मक क्वारंटाईन सक्ती

Dainik Gomantak
मंगळवार, 2 जून 2020

कर्नाटककडून नियमावली, इतर राज्यांतून आल्यास होम क्वारंटाईन

बंगळूर

एक जूनपासून कर्नाटकात येणाऱ्या सर्व आंतरराज्य प्रवाशांची आरोग्य तपासणी तसेच 14 दिवस होम क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहेत. तर महाराष्ट्रातून येणाऱ्यांसाठी वेगळे नियम तयार करण्यात आले असून 7 दिवस संस्थात्मक विलगीकरण व 7 दिवस होम क्वरांटाईनची सक्ती केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
केंद्र सरकारने आंतरराज्य प्रवासासाठी स्वतंत्र परवानगी, मान्यता किंवा ई-पासची आवश्‍यकता असणार नाही, असे आदेशात स्पष्ट केले आहे. तथापि, राज्याच्या आरोग्य विभागाने 1 जूनपासून "अनलॉक 1.0' कालावधीत कर्नाटकात दाखल झालेल्या आंतरराज्य प्रवाशांसाठी आणखी एक प्रोटोकॉल तयार केला.
परराज्यातून येणाऱ्या लोकांना कर्नाटकात प्रवेश करण्यापूर्वी सिंधू पोर्टलमध्ये नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. याव्यतिरिक्त सीमा चेकपोस्ट, विमानतळ, रेल्वेस्थानक आणि बसस्थानकांवर त्यांची तपासणी सक्तीची असून त्यांना 14 दिवसांचे होम क्वारंटाईन अनिवार्य करण्यात आले आहे.
दरम्यान, बाहेरुन आलेल्या लोकांमध्ये लक्षणे दिसल्यास त्यांच्या चाचण्या घेण्यात येतील. परंतु, कुटुंबातील मृत व्यक्तीच्या प्रसंगानिमित्त पररज्यातून येणारे, गरोदर स्त्रिया, 10 वर्षांखालील मुले, 60 वर्षांवरील वयोवृद्ध आणि गंभीर आजारासह राज्यात येणाऱ्या विशेष लक्षण असलेल्या व्यक्तीस हा नियम लागू होणार नाही. महाराष्ट्रातील व्यावसायिक प्रवाशांना ते व्यवसायासाठी आल्याचे सिध्द करावे लागणार आहे. परराज्यातील व्यक्तीला कर्नाटकातील व्यक्तीला भेटायचे असेल तर त्याच्या पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. तसेच त्यांना कोरोना निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र दाखल करावे लागेल. मात्र, हे प्रमाणपत्र दोन दिवसांपेक्षा अधिक जुने चालणार नसल्याचे आरोग्य विभागाने आदेशात म्हटले आहे.

चाचणी स्वखर्चाने घेणार
कोरोनाचे चाचणी प्रमाणपत्र नसलेल्यांना दोन दिवस संस्थात्मक विलगीकरण केंद्रावर पाठविले जाणार आहे. या कालावधीत चाचणी त्यांच्या स्वखर्चाने घेतली जाणार आहे. जर त्यांचा अहवाल नकारात्मक आल्यास त्यांना अलगीकरणातून सूट देण्यात येईल. दरम्यान, होम क्वारंटाईनमधील व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी तीन सदस्यांची टीम असणार आहे. होम क्‍वारंटाईनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

संबंधित बातम्या