राहुल गांधी जानेवारीत पुन्हा पक्षाध्यक्ष?

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

समेटाच्या हालचाली सुरू; पटेल यांची असंतुष्टांशी चर्चा

नवी दिल्ली: काँग्रेस कार्यकारिणीच्या वादळी बैठकीनंतर आता काँग्रेस पक्षात समेटाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून खजिनदार व सोनिया गांधी यांचे विश्‍वासू अहमद पटेल यांनी आज असंतुष्ट नेते गुलाम नबी आझाद यांच्याबरोबर फोनवर तपशीलवार चर्चा केली. पक्षातील एकंदर वातावरण लक्षात घेता राहुल गांधी यांच्या पक्षाध्यक्षपदी फेरनियुक्तीच्या प्रक्रियेला या प्रसंगाने गती मिळाल्याचे सांगितले जात असून, बहुधा जानेवारी महिन्यापर्यंत ती पूर्ण होईल असे संकेत पक्षातून मिळत आहेत.

काँग्रेस असंतुष्टांचे पत्र आणि कालची कार्यकारिणीची बैठक, त्यातील वाद आणि अखेरीस सोनिया गांधी यांनी हे असंतुष्ट आपले सहकारीच आहेत व सर्व विसरुन पुढे जाण्याबाबत केलेल्या निवेदनानंतर असंतुष्टांनीही त्याचे स्वागत केले. खुद्द आज आणि इतर नेत्यांनीही त्यांचे पत्र गांधी कुटुंबाविरुद्ध नसल्याचे स्पष्ट केले. सोनिया किंवा राहुल यांना त्यांचा विरोध नसल्याचेही त्यांनी सांगितल्याने तणाव निवळण्यास मदत झाली. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काल रात्री आझाद यांच्या निवासस्थानी काही असंतुष्ट नेत्यांची बैठक झाली व त्यात आजाद, कपिल सिब्बल आणि शशी थरुर यांनी सोनिया गांधी यांचे विधान सकारात्मक असल्याचे मान्य केले.

या प्रसंगाने पक्षाचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारण्याबाबत राहुल गांधी यांच्यावर दबाव वाढला असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. या प्रसंगाने राहुल गांधी यांनी अध्यक्षपद लवकरात लवकर स्वीकारावे यासाठी पक्षांतर्गत रेटा तयार झाला आहे आणि एक प्रकारे राहुल समर्थकांच्या पथ्यावरच ती गोष्ट पडल्याचे त्यांचे समर्थक सांगू लागले आहेत. यापुढील प्रक्रिया ठरल्याप्रमाणे पार पडल्यास जानेवारी महिन्यापर्यंत राहुल गांधी पुन्हा अध्यक्षपदी विराजमान झाल्याचे दिसून येईल असा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

पत्र फुटले कसे?
सोनिया गांधी यांनीही असंतुष्टांशी संपर्क साधून त्यांचे गाऱ्हाणे ऐकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांचे विश्‍वासू अहमद पटेल यांनी गुलाम नबी आझाद यांच्याबरोबर फोनवरुन तपशीलवार बोलणी केली. या चर्चेत पत्र फुटले कसे या प्रश्‍नाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते. परंतु असंतुष्टांच्या गोटातून मिळत असलेल्या माहितीनुसार हे पत्र राहुल गांधी यांच्या सहकाऱ्यांकडून फोडण्यात आल्याचे समजते. असंतुष्ट नेते हे भाजपशी संगनमत करीत असल्याची जी बातमी काल उठविण्यात आली होती त्यामागेही राहुल गांधी यांच्या टीममधील काही मंडळींचा हात असल्याची चर्चा आहे.

तो विषय देशाच्या दृष्टीने महत्वाचाः सिब्बल
नवी दिल्लीः संपूर्ण संघटनात्मक बदलांचा आग्रह धरत पक्षश्रेष्ठींचा रोष ओढवून घेणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आज पुन्हा त्यांची ‘मन की बात’ मांडली. हा विषय केवळ एका पोस्टपुरता मर्यादित नसून तो देशाच्या दृष्टिकोनातून देखील तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तत्पूर्वी काँग्रेसच्या २३ बड्या नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून संघटनात्मक फेरबदलांची मागणी केली होती. या पत्रामुळे काँग्रेसमध्येही दोन गट असल्याचे उघड झाले होते. पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीमध्येही याच मुद्यावरून दोन गटांमध्ये बरीच वादळी चर्चा झाली होती, अखेरीस पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता.

संबंधित बातम्या