नोटाबंदी हा असंघटित क्षेत्रावरचा हल्ला: राहुल गांधी

नोटाबंदी हा असंघटित क्षेत्रावरचा हल्ला
नोटाबंदी हा असंघटित क्षेत्रावरचा हल्ला

नवी दिल्ली: नोटाबंदी हा गरीब आणि असंघटित क्षेत्रावरचा हल्ला होता आणि हे क्षेत्र नष्ट करण्याचा हेतु त्यामागे होता. तसेच बड्या उद्योगांची कर्जे माफ करण्याचाही त्यामागे डाव होता, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केला असून याविरुद्ध लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक मुद्यांवर जनतेबरोबर संवाद साधण्याच्या मालिकेत त्यांनी नोटाबंदीवर भाष्य केले.

पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री देशात नोटाबंदी जाहीर करुन पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याची आठवण देऊन, राहुल गांधी म्हणाले, की यानंतर नोटा बदलण्यासाठी सारा देश बॅंकांसमोर रांगेत उभा राहिला. ही घोषणा करताना पंतप्रधानांनी काळा पैसा नष्ट होण्याचा दावा केला होता. खरोखर यानंतर काळा पैसा नष्ट झाला काय या प्रश्‍नाचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. त्याचप्रमाणे या निर्णयाचा फायदा कुणाला झाला? याचा फायदा अब्जाधीशांना झाला. कारण सामान्य माणसाने ज्या अपेक्षेने पैसे बॅंकामध्ये भरले त्याचा उपयोग बड्या उद्योगांची कर्जे चुकविण्यासाठी किंवा माफ करण्यासाठी केला गेला, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. 

या निर्णयाचा आणखी एक गोपनीय हेतु होता, असा आणखी एक सनसनाटी आरोप लावून ते म्हणाले, की भारतातील असंघटित क्षेत्र प्रामुख्याने रोख पैशावर चालते. लहान दुकानदार, शेतकरी, कष्टकरी हे सर्वच रोजंदारीवर काम करुन रोख पैशाच्या आधारे काम करीत असतात. या असंघटित क्षेत्राचे अस्तित्वच नष्ट करण्याचा या निर्णयामागील गुप्त हेतु होता. पंतप्रधानांनी स्वतःच कॅशलेस म्हणजे रोकड-विरहित उलाढाली व व्यवहार करण्यास प्राधान्य देण्याचे जाहीर केले होते.

रोखीचे व्यवहार करणारे भरडले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदींच्या वेळी ‘कॅशलेस इंडिया’, ‘कॅशलेस हिंदुस्तान’चे स्वप्न जाहीर केले होते. प्रत्यक्षात देशात रोजच्या रोज रोकडवर चालणाऱ्या असंघटित क्षेत्राला नष्ट करण्याचे हे षड्‌यंत्र होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. नोटाबंदीच्या  प्रक्रियेत कोण भरडले गेले असा सवाल करुन त्यांनी शेतकरी, कष्टकरी, लहान दुकानदार, लघु व मध्यम उद्योजक जे रोखीच्या व्यवहारावर अवलंबुन होते ते सर्व या निर्णयात भरडले गेले. हा एक प्रकारे या वर्गावरच हल्ला होता, असे त्यांनी नमूद केले. या हल्ल्याचे परिणाम सध्या दिसत आहेत आणि आता त्याविरुद्ध लढा देण्याची वेळ आली आहे. सर्वांनी एकत्रितपणे तो देण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com