राहुल गांधींचा 'इंटेन्ट आणि कंटेन्ट'वरून नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल 

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज नव्या कृषी कायद्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज नव्या कृषी कायद्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत सरकारवर सरकारवर निशाणा साधताना, नव्या कृषी विधेयकामुळे मंडई व्यवस्था कोलमडणार असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाषणात ज्या शेतीविषयक तीन कायद्यांचा उल्लेख केला होता, त्याबाबत 'इंटेन्ट आणि कंटेन्ट'वर जोरदार टीकास्त्र सोडले. 

पॅंगॉन्गच्या वादग्रस्त भागातून चीनचे टॅंक मागे जाण्यास सुरवात (व्हिडिओ) 

राहुल गांधी यांनी लोकसभेत सरकारला धारेवर धरताना, काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या वेळेस विरोधक कृषी कायद्याच्या आंदोलनाबाबत बोलत असून, 'इंटेन्ट आणि कंटेन्ट' वर बोलत नसल्याचे सांगितल्यामुळे आज आपण त्यांचे एकूण फक्त यावरच बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नवीन कृषी कायद्याच्या आधारावरून सरकारचा हेतू मंडई व्यवस्था संपवण्याचा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर या वादग्रस्त कायद्यामुळे मोठे व्यापारी त्यांना हवे तेवढे धान्य, फळे आणि भाज्या साठवून ठेवू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर, या व्यापाऱ्यांना पाहिजे तेवढी होर्डिंग्ज करण्याची सूट मिळणार असल्याचे ते म्हणाले. 

याव्यतिरिक्त, या कायद्याचा इंटेन्ट हा देशातील जीवनावश्यक कायदा मोडीत काढण्याचा असल्याचा मोठा आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. आणि त्यानंतर देशात अनलिमिटेड होर्डिंग्जला सुरवात करण्याचा हेतू असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. तसेच यातील तिसऱ्या कायद्यात जेव्हा एखादा शेतकरी आपल्या पिकांच्या योग्य किंमतीची मागणी करण्यासाठी सर्वात मोठ्या व्यावसायिकाकडे जाईल, तेव्हा त्याला न्यायालयात जाण्याची परवानगी मिळणार नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. आणि त्यानंतर देखील हा कायदा लागू केल्यास देशात भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या होतील असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना केला. 

दरम्यान, नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना आपले मत लोकसभेत मांडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांवर आणि खासकरून कॉंग्रेसवर जोरदार हल्ला केला होता. यासंदर्भात बोलताना पंतप्रधानांनी देशाला आंदोलनकर्ते आणि आंदोलनजीवी यांच्यातील फरक ओळखण्याचे आव्हान केले होते. शिवाय यावेळेस नरेंद्र मोदी यांनी नव्या कृषी कायद्यांचे फायदे देखील सांगत, 21 व्या शतकात असताना 18 व्या शतकाप्रमाणे विचार करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. याशिवाय सध्या शेती आधुनिक करणे आवश्यक असल्याचे म्हणत, विरोधक आंदोलनाबाबत बोलत असून ते कायद्याच्या 'इंटेन्ट आणि कंटेन्ट'वर बोलत नसल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला होता. तसेच जागतिक बाजारानुसार कृषी क्षेत्रात उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले होते.   

संबंधित बातम्या