राहुल गांधींनी चालवला ट्रॅक्टर; मनरेगावरून सरकारला सुनावले

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केरळमधील वायनाडमध्ये एक ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी राहुल गांधींनी स्वत: ट्रॅक्टर चालविला आणि कॉंग्रेसचे अनेक नेते त्यांच्या ट्रॅक्टरवर बसले होते.

केरळ: कॉंग्रेस नेते राहुल गांधी आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी केरळ आणि तमिळनाडूच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केरळमधील वायनाडमध्ये एक ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी राहुल गांधींनी स्वत: ट्रॅक्टर चालविला आणि कॉंग्रेसचे अनेक नेते त्यांच्या ट्रॅक्टरवर बसले होते. तत्पूर्वी राहुल गांधींनी भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

'भाजपाची कल्पना ही शक्तिशाली लोकांचे सबलीकरण आहे, परंतु आमची कल्पना दुर्बलांना सक्षम बनविणे आहे. देशाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेवून चालण्यावर आमचा विश्वास आहे.

मनरेगासाठी पंतप्रधान मोदींवरही त्यांनी हल्लाबोल केला. "पंतप्रधान मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) योजनेला संसदेत कमकुवत म्हणत होते. पण कोरोना साथीच्या काळात हीच योजना वरदान ठरली आणि पंतप्रधान मोदींना यासाठी अर्थसंकल्प वाढवावे लागले. यूपीएच्या काळात विकासाचे मोठे कारण मनरेगा होते, कारण यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत पैसा आला,"असे मत राहूल गांधी यांनी व्यक्त केले आहे.

"भारतातील शेतकरी कशा प्रकारे त्रास घेत आहेत हे जगाला कळून चुकले आहे, परंतु दिल्लीत बसलेल्या सरकारला शेतकर्‍यांचे दुःख जाणवत नाही. पॉप स्टार्स शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर भाष्य करीत आहेत. मोदी सरकारला या प्रकरणात रस नाही. जोपर्यंत आपण सरकारवर दबाव आणत नाही तोपर्यंत तीन नवीन कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत. हे तीन कायदे मोदींच्या 2 किंवा 3 व्यावसायिक मित्रांच्या फायद्यासाठी तयार केले गेले आहेत," अशी टीका राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर केली आहे.

सर्वसामान्यांना पुन्हा मोठा झटका!  पेट्रोल-सिलिंडर बरोबर आता कांदाही रडवणार 

राहुल गांधी उद्या मंगळवारी तिरुअनंतपुरमला भेट देणार आहेत. येथे कर्करोग तपासणी व उपचार केंद्राचे उद्घाटन करणार आहे. येत्या मे महिन्यात केरळमध्ये विधानसभा निवडणुका आहेत.

 

 

 

संबंधित बातम्या