राहुल गांधी: खोटे पसरविल्याने सत्य दडणार नाही

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

फेसबुक प्रकरणावरून आक्रमक झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले. फेसबुकवर खोट्या बातम्या पसरवून बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या सर्वानाशाचे सत्य दडणार नाही, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे. 

नवी दिल्ली: फेसबुक प्रकरणावरून आक्रमक झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले. फेसबुकवर खोट्या बातम्या पसरवून बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या सर्वानाशाचे सत्य दडणार नाही, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे. 

भारतात फेसबुक आणि व्हॉट्‌सॲपवर सत्ताधारी भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियंत्रण असल्याचा दावा राहुल गांधींनी ‘वॉल स्ट्रिट जर्नल’च्या हवाल्याने नुकताच केला होता. त्यानंतर याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल यांनी सरकारवर शरसंधान केले. मागील चार महिन्यांमध्ये जवळपास दोन कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या. दोन कोटी कुटुंबांचे भविष्य अंधःकारमय झाले आहे असे ते म्हणाले.

भाजपने त्यांच्यावरील आरोप नाकारताना काँग्रेसवर पलटवार केला. तर काँग्रेसने या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर यावी यासाठी संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशीची मागणी रेटली आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेस खासदार व संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले शशी थरूर यांनी या प्रकरणाबाबत आपली समिती चौकशी करेल आणि फेसबुकच्या अधिकाऱ्यांना समितीसमोर पाचारण करेल, असे म्हणून नव्या वादाला तोंड फोडले आहे. यासोबतच काँग्रेसने फेसबुकच्या भारतातील अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांना पत्रही पाठविले आहे.
 

संबंधित बातम्या