‘स्थायी’तील वादावरून राहुल यांचा पत्रप्रपंच

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

काल झालेल्या खडाजंगीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी समितीचे अध्यक्ष ज्युएल ओराम यांच्याविरुद्ध लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.

नवी दिल्ली: संरक्षण विषयक संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत काल झालेल्या खडाजंगीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी समितीचे अध्यक्ष ज्युएल ओराम यांच्याविरुद्ध लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.

संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत सैनादलांचा गणवेश, पदकांवर चर्चा सुरू असताना राहुल गांधींनी आक्षेप घेऊन यावर सेनाधिकाऱ्यांशी बोलण्याऐवजी सैन्यक्षमता, व्यूहरचना, सेनादलांची गरज यावर चर्चा करावी असे मत मांडले होते. त्यावर समितीचे अध्यक्ष ज्युएल ओराम यांनी बोलण्यास परवानगी नाकारल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला होता.  राहुल गांधींनी पत्रात म्हटले आहे, की समितीच्या अजेंड्याबाहेरील विषय उपस्थित करण्याचा सदस्यांचा अधिकार आहे. माझ्या म्हणण्याशी समिती सहमत नसेलही. परंतु, अध्यक्षांनी यावर एकाही सदस्याला बोलू दिले नाही, ही दुःखद बाब आहे. लोकसभाध्यक्ष हे सभागृहाचेपालक असल्याने हस्तक्षेप करावा, अशी मागणी राहुल गांधींनी केली. 

चीनने बळजबरीने भारतीय भूभाग बळकावल्यामुळे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. यामुळे आपले २० जवान हुतात्मा झाले आहेत. यासारखे अनेक गंभीर विषय चर्चेला येणे आवश्यक आहे, असेही  त्यांनी म्हटले 
आहे.

संबंधित बातम्या