भारतीय रेल्वेच्या खासगीकरणाबाबत रेल्वे मंत्र्यांचं मोठं विधान

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 मार्च 2021

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मंगळवारी लोकसभेतील चर्चेत रेल्वेच्या खासगीकरणा बद्दल बोलताना, रेल्वेचे कधीही खासगीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले.

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मंगळवारी लोकसभेतील चर्चेत रेल्वेच्या खासगीकरणा बद्दल बोलताना, रेल्वेचे कधीही खासगीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र रेल्वे मध्ये खासगी गुंवणूक होणार असेल तर याचे स्वागतच असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. केंद्र सरकारने रेल्वेमध्ये खासगी गुंवणूकीची दारे उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारवर खासगीकरणाला बळ देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी पहिल्यांदाच विरोधकांच्या टीकेवर उत्तर दिले. 

बँकांच्या खासगीकरणाबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांचं मोठं विधान
 
लोकसभेत रेल्वेसाठीच्या अनुदान मागणीबद्दल होणाऱ्या चर्चेत बोलत असताना पियुष गोयल यांनी, रेल्वेचे कधीही खासगीकरण होणार नसल्याचे नमूद केले. मात्र ज्या पद्धतीने रस्त्यावर खासगी वाहने चालतात त्याप्रमाणे रेल्वेमध्ये सुद्धा खासगी गुंतवणुकीचे स्वागत केले जाणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शिवाय यामुळे प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये प्रगती होणार असल्याचे मत पियुष गोयल यांनी लोकसभेत बोलताना व्यक्त केले. यानंतर, 2019-20 मध्ये 1.5 लाख करोडची गुंतवणूक असलेल्या रेल्वे खात्यात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात वाढ होऊन ही गुंवणूक आज 2.5 लाख करोड पर्यंत पोहोचली असल्याची माहिती पियुष गोयल यांनी दिली. 

याव्यतिरिक्त, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्र सरकारला बुलेट ट्रेनसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. जर महाराष्ट्र सरकारने बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी, टर्मिनल तयार करण्यासाठी राज्यातील जमीन उपलब्ध करून दिली, तर देशात जागतिक दर्जाची,जपानी तंत्रज्ञानाची बुलेट ट्रेन सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गुजरात आणि दम-दिसू मधील जमिनीचे अधिग्रहण झाले असून, फक्त महाराष्ट्रातील 24 टक्के जमिनीचे अधिग्रहण बाकी असल्याची माहिती पियुष गोयल यांनी दिली. त्यानंतर, कोरोना काळात सुद्धा रेल्वे सेवा सुरु ठेवण्यात योगदान दिल्याबद्दल पियुष गोयल यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचे यावेळी कौतुक केले.

संबंधित बातम्या