कामातील दिरंगाईवरून चिनी कंपनीशी कंत्राट रद्द

Dainik Gomantak
शुक्रवार, 19 जून 2020

रेल्वेकडून निर्णय जाहीर; ४७१ कोटींचा करार मागे

नवी दिल्ली

गलवान खोऱ्यात वीस भारतीय जवान हुतात्मा झाल्याने देशभरात चीनविरुद्ध संतापाची लाट उसळलेली असताना भारतीय रेल्वेने चीनच्या कंपनीसमवेत असलेले ४७१ कोटी रुपयांचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे कामात प्रगती नसल्याने रेल्वेने करार रद्द करत असल्याचे रेल्वेने जाहीर केले.
चीनची कंपनी बीजिंग नॅशनल रेल्वे रिसर्च ॲड डिझाइन इन्स्टिट्यूट ग्रुप कंपनी लिमिटेडसमवेत २०१६ रोजी करार करण्यात आला होता. या कंत्राटानुसार कानपूर ते दीनदयाळ उपाध्याय रेल्वे स्थानक यादरम्यान ४१७ किलोमीटर अंतराचे सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन्सचे काम करण्यात येणार होते. हे काम ४७१ कोटी रुपयांचे होते. मात्र, कामातील प्रगती संथ असल्याचे कारण सांगून कंत्राट रद्द करण्याचा निर्णय डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने घेतला. निवेदनात म्हटले की, करारानुसार सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनचे काम २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु ते काम झाले नाही आणि आतापर्यंत केवळ २० टक्केच काम पूर्ण झाले. प्रलंबित काम लवकर पूर्ण करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी चिनी कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली; पण त्याचा उपयोग झाला नाही. चिनी कंपनीने कामात वेग आणला नाही आणि पूर्ण करण्याबाबत हालचाल केली नाही. याशिवाय करारानुसार टेक्निकल डॉक्युमेंट जसे की लॉजिक डिझाइन, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कंपनीने दाखल केले नाही. याशिवाय कामाच्या ठिकाणी कंपनीचा कोणताही अभियंता आणि अधिकारी हजर राहत नसल्याचा उल्लेख रेल्वेने केला आहे

संबंधित बातम्या