पंजाबचे आंदोलन अडत्यांच्या हिताचे?

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

पंजाबमध्ये कृषी कायद्यांविरुद्धच्या आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने २२०० हून अधिक गाड्या रुळावरच अडकल्याने रेल्वेचे १२०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

नवी दिल्ली:  पंजाबमध्ये कृषी कायद्यांविरुद्धच्या आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने २२०० हून अधिक गाड्या रुळावरच अडकल्याने रेल्वेचे १२०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनियंत्रित आंदोलनावरून केंद्राने पंजाब सरकारवर निष्क्रियतेचा ठपका ठेवला आहे. हे आंदोलन अडत्यांच्या हिताचे आहे काय? असा आरोपही केला आहे. 

कृषी सुधारणा कायद्यांना पंजाबमध्ये विरोध सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी रेल्वेमार्गावर धरणे आंदोलन आरंभल्याने राज्यातील रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे. रेल्वेने आज दिलेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये ३२ ठिकाणी रेल्वे रुळावर आंदोलन सुरू असून रेल्वे मार्गासोबतच फलाटांनजीकही आंदोलन सुरू आहे. अमृतसर, नाभा, फिरोजपूर मोगा, जान्दिया और भटिंडा या भागात काही ठिकाणी आंदोलकांनी रेल्वे मार्गाचे नुकसान करून मालगाड्या अडविल्यामुळे रेल्वेला नुकसान सहन करावे लागत आहे. तर, जांदियाला, नाभा, तलवंडी, साबू आणि भटिंडा या भागात आंदोलकांनी अचानक रेल्वे अडविल्या आहेत. 

रेल्वेचे मुख्यमंत्र्यांना पत्र
१५ ते २० दिवसांपासून रेल्वे गाड्या अडकून पडल्याने तब्बल २२२५ रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प आहे. तर, तब्बल १३५० प्रवासी रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या किंवा काही गाड्यांचा मार्ग बदलावा लागला आहे. पंजाबसह जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशात होणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. यामुळे रेल्वेचे तब्बल १२०० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता पाहता पंजाबमध्ये रेल्वेमार्गाची सुरक्षा आणि वाहतूक पुन्हा सुरू होण्यासाठी रेल्वेने मुख्यमंत्री २६ ऑक्टोबरला पत्रही लिहिले आहे. मात्र अद्याप वाहतूक ठप्पच आहे.

आंदोलन काळातही धान खरेदी
माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी हे आंदोलन अडतांच्या हितासाठी सुरू आहे काय, असा खोचक सवालही केला. जावडेकर म्हणाले, की आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीस राज्य सरकारची निष्क्रियता कारणीभूत आहे. आंदोलन सुरू असतानाही पंजाबमध्ये धानाची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचाही दावा जावडेकर यांनी केला. 

संबंधित बातम्या