आंदोलक शेतकऱ्यांना पावसाचा त्रास ; आज पुन्हा सरकारबरोबर चर्चा करणार

PTI
सोमवार, 4 जानेवारी 2021

केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांना रात्री पडलेल्या जोरदार पावसाने चांगलेच अडचणीत आणले.

नवी दिल्ली :  केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांना रात्री पडलेल्या जोरदार पावसाने चांगलेच अडचणीत आणले. तंबूंमध्ये पाणी शिरणे, कपडे ओले होणे, रस्त्यांवर पाणी तुंबून राहणे, अशा समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. उत्तर भारताला कडाक्याच्या थंडीने बेजार केले आहे. अशा थंडीतच शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम रहात आंदोलन करत आहेत.

अशातच काल परवा रात्री दिल्लीत अचानक पाऊस कोसळला. यामुळे सखल भागांमध्ये भरपूर पाणी साठले. आंदोलनाच्या ठिकाणीही पाणी साठल्याने शेतकरी हैराण झाले. पावसामुळे तापमानाचा पारा आणखीनच खाली आला. पावसामुळे कपडे आणि चादरी भिजल्याने अनेकांना या वाढलेल्या थंडीचा त्रास होत होता. त्यांना पुरविण्यात आलेले तंबू वॉटरप्रुफ असले तरी ते थंडीपासून बचाव करू शकत नाहीत. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेकोटीसाठी लाकडे गोळा केली होती. ही लाकडेही पावसाने भिजवून टाकली. आम्ही एवढा त्रास सहन करत असताना सरकारला मात्र यातील काहीही दिसले नाही, असा संताप सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या गुरविंदरसिंह या शेतकऱ्याने केली. कितीही त्रास झाला तरी मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही हलणार नाही, असा निर्धारही या शेतकऱ्याने व्यक्त केला. 

आज पुन्हा चर्चा

शेतकरी संघटना आणि सरकारदरम्यान आज चर्चा होणार आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने (एआयकेएससीसी) सरकारला वादग्रस्त ३ कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. एका अध्यादेशाद्वारे कायदे रद्द होऊ शकतात, असा पर्याय शेतकरी संघटनांनी सुचवला. तसेच या वाटाघाटींचे यश कायदे रद्द करण्यावरच अवलंबून असल्याचा इशारा दिला. भाजप सरकारमध्ये कॉर्पोरेटचे आदेश उल्लंघन करण्याची राजकीय इच्छा शक्ती नसल्याचा आरोप करताना तोडगा न काढल्यास आंदोलन आणखी पसरेल, असा इशाराही किसान संघर्ष समन्वय समितीने दिला आहे.

हाडे गोठवणाऱ्या थंडीत आज झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण वाढविली असून आणखी तीन शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. कालच एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. उत्तर हिंदुस्थानात आधीच थंडीची लाट असताना काल आणि आज दिल्लीत जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे आज आणखी तीन शेतकऱ्यांना प्राण गमवावे  लागले. 

संबंधित बातम्या