निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचा ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लबोल   

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगालच्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगालच्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. डाव्यांच्या 34 वर्ष आणि ममता बॅनर्जी यांच्या 10 वर्षांच्या राज्यातील सत्तेने पश्चिम बंगालला औदयोगिक क्षेत्रात 44 वर्षांनी मागे नेले असल्याचे टीकास्त्र राजनाथ सिंह यांनी सोडले आहे. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात पश्चिम बंगाल मध्ये महामार्ग बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आल्याचे सांगून, आता हे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत अडकणार, भटकणार आणि थांबणार नसल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. व यासाठी कारण देताना यंदाच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचा पराभव होणार असून, भाजप सत्तेवर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

त्यानंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर देखील टीका करताना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विधानाचा हवाला दिला. दिल्लीवरून पाठविलेले 100 पैसे हे जनतेपर्यंत जाताना 14 पैसेच पोहचत असल्याच्या राजीव गांधी यांच्या वक्तव्याचा आधार घेत, राजीव गांधी यांनी यासाठी आपण मजबूर असल्याचे म्हटले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण मजबूर नाही तर मजबूत पंतप्रधान असल्याचे सांगितल्याचे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सध्याच्या घडीला ना मां सुरक्षित, ना माटी सुरक्षित आणि ना मानुष सुरक्षित असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. आणि मागील सात ते आठ वर्षात 150-200 भाजप कार्यकर्ते मारले गेले आणि दीड हजार जखमी झाले असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

पाच राज्यातील निवडणूकीचे वाजले बिगुल; या दिवशी लागणार निकाल

तसेच, पश्चिम बंगालमधील भ्रष्टाचार आणि राजकीय हिंसाचार हा साथीच्या रोगासारखा असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगून, याची वॅक्सीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय दोन वर्षांपूर्वी 26 फेब्रुवारी रोजीच बालाकोट सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. यानंतर देशांच्या सीमेचे पावित्र्य कोणत्याही परिस्थितीत बिघडू देणार नसल्याचे राजनाथ सिंह यांनी नमूद करत, बांगलादेशला लागून असलेल्या भागात अवैध घुसखोरी, तस्करी आणि मानवी तस्करी रोखणार असल्याचे ते म्हणाले. 

याव्यतिरिक्त, केंद्रात युपीएचे सरकार असताना पश्चिम बंगालला 13 व्या वित्तीय आयोग अंतर्गत एक लाख 32 हजार करोड रुपये मिळाले होते. तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर 14 व्या वित्त आयोगांतर्गत पश्चिम बंगालला 4 लाख 48 हजार करोडचा निधी देण्यात आल्याचा खुलासा  राजनाथ सिंह यांनी केला. त्यानंतर राज्यात ममता बॅनर्जी या 'खेळ होबे' म्हणत आहेत. व त्या हे बरोबरच म्हणत असल्याचे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित करत,  'खेल होबे .... निश्चयी होबे ... आता पश्चिम बंगाल मध्ये बोडो खेल होबे. राज्यात विकासाचा खेळ होबे, शांततेचा खेळ होबे, ममता दीदी ऐई ‘दादागिरी’ चोलबे न... व त्यासाठी राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन करण्याचे आवाहन त्यांनी केले. आणि 'शोनार बांगला'चे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे आश्वासन पुढे राजनाथ सिंह यांनी दिले.        

संबंधित बातम्या