Farmers Protest : "कानून वापसी नहीं तो घर वापसी नहीं"

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलन करत आहेत.

केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीत घडलेल्या हिंसक घटनेनंतर देखील, पंजाब-हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे तीन कृषी कायद्याविरोधात निदर्शने दिल्लीच्या वेशीवर सुरू आहेत. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनी आज गाझीपूर सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाच्या वेळेस नवा नारा दिला आहे. राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारने दिलेल्या फेटाळला असून, 'कानून वापसी नहीं तो घर वापसी नहीं,' असे म्हटले आहे. 

शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला; कॉंग्रेसच्या...

नवीन कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलन करत असलेले शेतकरी आणि सरकार यांच्यातील नवव्या फेरीच्या चर्चेत सरकारने तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे दीड वर्षांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर सरकारने दिलेला हा प्रस्ताव फेटाळत असल्याचे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. याशिवाय तिन्ही कृषी कायदे पूर्णपणे रद्द करून, एमएसपीवर आधारित कायदा करण्याची मागणी राकेश टिकैत यांनी केली. दिल्लीच्या सीमारेषेवरील युपी गेटवर 28 नोव्हेंबर पासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात आज आंदोलनकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. यावेळेस राकेश टिकैत यांनी हे आंदोलन कायदा रद्द होईपर्यंत मागे घेण्यात येणार नसल्याचे सांगितले. तसेच 'कानून वापसी नहीं तो घर वापसी नहीं,' असा नारा राकेश टिकैत यांनी दिला आहे. 

याशिवाय, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज युपी गेटवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. व यावेळेस संजय राऊत यांनी भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांची भेट घेतली. त्यानंतर राकेश टिकैत यांनी विरोधी पक्ष शेतकरी आंदोलनाला समर्थन करत असतील तर काहीच हरकत नसल्याचे सांगितले. मात्र यावरून राजकारण करू नये, असे ते म्हणाले. याव्यतिरिक्त, विरोधी पक्षांचे नेते आंदोलनस्थळी येत असतील तर आपण काहीच करू शकत नसल्याचे राकेश टिकैत यावेळेस म्हटले आहे. 

दरम्यान, गाझीपूरच्या सीमेवर आंदोलकांची संख्या वाढू लागली आहे. आणि त्यामुळे गाझीपूर सीमेभोवती पोलिसांनी बॅरिकेडिंग केली आहे. तसेच पोलिसांनी या ठिकाणी सिमेंटचे बॅरिकेट्स उभे केले असून, रस्त्यावर खिळे देखील लावण्यात आले आहेत. त्यामुळे आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा वापर करत सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या ट्रॅक्टरचे टायर फुटणार आहे. सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर शेतकर्‍यांच्या निदर्शनांमुळे आज दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागातून वाहतुकीचा मार्ग वळविण्यात आला आहे.           

संबंधित बातम्या