कोरोनाच्या नवीन 'स्ट्रेन'च्या उपचारांबाबत रामदेव बाबा यांचा मोठा दावा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 30 डिसेंबर 2020

जुन्या कोरोनापेक्षा  कोरोनाचे हे नवीन स्वरूप ७० टक्के जास्त धोकादायक असल्याचे वैज्ञानिक जगतात बोलले जात आहे. योगगुरू रामदेव बाबा यांनी या  नवीन स्ट्रेनच्या उपचारांबाबत मोठा दावा केला आहे.  

नवी दिल्ली- भारतात आज दुपारपर्यंत ब्रिटनमधून आलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे ३० नवीन रूग्ण आढळून आले आहेत. जुन्या कोरोनापेक्षा  कोरोनाचे हे नवीन स्वरूप ७० टक्के जास्त धोकादायक असल्याचे वैज्ञानिक जगतात बोलले जात आहे. योगगुरू रामदेव बाबा यांनी या  नवीन स्ट्रेनच्या उपचारांबाबत मोठा दावा केला आहे.  

एका माध्यमाशी बोलताना बाबा रामदेव यांनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनसाठी आम्ही तयार असल्याचे म्हटले आहे. 'आम्ही आमच्या औषधाचा नवीन अवतार लॉन्च केला असून नव्या कोरोनासोबत आम्ही लढू आणि त्याला पराभूत करू',असेही ते यावेळी म्हणाले.

पतंजलिचे आचार्य बाळकृष्णही यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते. ते म्हणाले, 'कोरोना विषाणू जर आपले रूप बदलत असेल तर कोणत्या रूपात तो समोर येणार आहे यावर आयुर्वेदाच्या माध्यमातून अभ्यास सुरू आहे. स्पाइक प्रोटीनमध्ये काम करणाऱ्या सोडो विषाणूवर संशोधन करून काम केले जात आहे. ज्यांनी योग आणि प्राणायाम केले ते अजूनही कोरोनापासून वाचून आहेत.'  

मात्र, बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. जगातील अनेक औषधनिर्माण कंपन्या कोरोनाची लस तयार करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. काही देशांमध्ये आपत्कालिन लस म्हणून  काही लशींना मान्यताही देण्यात आल्या आहेत. मात्र, औषधांवर अजूनही संशोधन सुरूच आहे. कोरोनाची कोणतीही औषधी मात्र, अद्याप कोणत्याही देशात तयार करण्यात आलेली नाही. लक्षणांवर आधारित उपचार केले जात आहेत.   

रामदेव यांच्या पतंजलि कंपनीने जून २०२० मध्ये 'कोरोनिल टॅबलेट' आणि 'श्वासारी वटी' बाजारात आणले होते. कोरोनावरील उपचारांसाठी ही आयुर्वेदीक औषधी उपयुक्त असल्याचा दावा त्यांनी केला होता. या दाव्यांवर अनेक शंकाही उपस्थित कऱण्यात आल्या. वैज्ञानिकांनीही यावर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले होते. 

संबंधित बातम्या