रमेश जारकीहोळींची पालकमंत्रिपदी वर्णी

Dainik Gomantak
बुधवार, 3 जून 2020

आमदार कुमठळ्ळींकडे झोपडपट्टी विकास महामंडळ; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

बंगळूर

पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांची अखेर बेळगाव जिल्हा पालकमंत्रिपदी वर्णी लागली आहे. तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. गोपालय्या यांना हासन जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. मंत्रिपदाची संधी हुकल्याने नाराज झालेले अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांची राज्याच्या झोपडपट्टी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांना बेळगाव जिल्ह्याचा प्रभार देण्यात आला होता. मात्र, आता अपेक्षेप्रमाणे रमेश जारकीहोळी यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी जे. सी. माधुस्वामी हासन जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता ही जबाबदारी के. गोपालय्या यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. राज्यातील युती सरकारचे पतन करून भाजप सरकार सत्तेवर येण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जारकीहोळी यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची मागणी केली होती. बेळगाव जिल्ह्यातील मंत्रिपदावर असलेल्या शशीकला जोल्ले, लक्ष्मण सवदी आणि रमेश जारकीहोळी यांच्यात झालेल्या स्पर्धेमुळे मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याबाहेरील जगदीश शेट्टर यांच्याकडे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपविले होते. मात्र, मंत्री जारकीहोळी यांना आता पालकमंत्रिपद देणे अनिवार्य ठरले आहे.
बी. गोपालय्या पूर्वी धजदमध्ये होते. हासन जिल्हा हा धजदचा बालेकिल्ला असून देवेगौडा कुटुंबीयांना सामोरे जाण्यासाठी गोपालय्या यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले आहे. दरम्यान, कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार महेश कुमठळ्ळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुमठळ्ळी यांनीही कॉंग्रेसमध्ये बंडखोरी करून भाजपात प्रवेश केला होता. परंतु, अथणीच्या लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपद दिल्याने कुमठळ्ळी यांची मंत्रिपदाची संधी हुकली होती. त्यामुळे त्यांना आता महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या