'लसीसाठीचा कच्चा माल युरोप आणि अमेरिकेने थांबवला'

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 8 एप्रिल 2021

अमेरिका आणि युरोपमधून कोरोना लसीसाठी कच्च्या मालाचा पुरवठा होतो.

देशभरात कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र आता कोरोना लसीचा तुटवडा हा नवा चर्चेचा आणि राजकारणाचा विषय ठरला आहे. त्यात आता कोरोना लस निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा भासू लागला आहे. कोवीशील्ड या कोरोना लसीचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी या संबंधी माहीती दिली आहे. ‘’अमेरिका आणि युरोपमधून कोरोना लसीसाठी कच्च्या मालाचा पुरवठा होतो. मात्र त्यांनी या कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्यामुळे सीरम इन्स्टिट्यूटला कच्चा माल मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे,’’ असं अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे. त्यामुळे देशातील कोरोना लसीकरणाचा वेग मंदावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोना लसीकरणाची मोहीम देशात मोठ्याप्रमाणावर सुरु झाली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोना लसीकरण मोठ्याप्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे देशभरातून कोरोना लसींची मागणी वाढू लागली आहे. महाराष्ट्रासारख्या काही मोठ्या राज्यांनी आत्तापासूनच कोरोना लसींचा आवश्यक तेवढा पुरवठा केंद्र सरकारकडून होत नसल्याच्या तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये कोरोना लसींची मागणी अजून वाढणार असताना लसींच्या निर्मितीसाठी कच्च्या मालाची कमतरता भासणं हे चिंतेचा विषय ठरत आहे. (Raw material for vaccines stopped by Europe and US)

कोरोनाच्या भीतीने दिल्ली- पुण्यातील मजूर कामगार पुन्हा आपापल्या घराकडे रवाना 

दरम्यान अदर पुनावाला यांनी युरोप आणि अमेरिकेमधून कोरोना लसींची निर्मिती करण्यासाठी लवकरच कच्च्या मालाचा पुरवठा सुरु करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ‘’मला शक्य असतं तर मी स्वत: अमेरिकेमध्ये गेलो असतो आणि त्यांच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी अंदोलन केलं असतं. आणि त्यांना सांगितलं असतं तुम्ही फार महत्त्वाचा असणारा कच्चा माल अडवून धरला आहे. भारतातील नव्हे तर जगभरातील कोरोना लस निर्मिती करणाऱ्या उत्पादकांसाठी हा कच्चा माल अत्यंत आवश्यक आहे,’’ असं अदर पुनावाला म्हणाले आहेत.
 

संबंधित बातम्या