जंगलमहालमध्ये नक्षलवाद्यांची फेरजुळणी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

प.बंगालमधील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील झारग्राम उपविभागात बेलपाहारीमध्ये १४ ऑगस्टच्या रात्री नक्षलवाद्यांनी अनेक गावांमध्ये प्रवेश करत काळे झेंडे दाखवले.

कोलकता: प.बंगालमधील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील झारग्राम उपविभागात बेलपाहारीमध्ये १४ ऑगस्टच्या रात्री नक्षलवाद्यांनी अनेक गावांमध्ये प्रवेश करत काळे झेंडे दाखवले. लाल शाईतील पोस्टर लावली, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली. सुमारे २० ते २५ नक्षलवाद्यांनी चारपाच गटात विभागात रात्रभर बैठका घेतल्या. पहाट होण्यापूर्वी सर्वजण पसार झाले. असेही वृत्त आहे. 

गुप्तचर सूत्राच्या माहितीनुसार झारखंड सीमेवरील चार ते पाच किमीच्या परिसरातील तावेदा, साखभंगा, पाचपानी, बंकशोल आणि चरकपहरी आदी गावांमध्ये तरुण नक्षलवाद्यांच्या गटाने प्रवेश केला. विशेष म्हणजे सुरक्षा दलांच्या रात्रीची गस्तही या नक्षलवाद्यांची रात्रीची बैठक थांबवू शकली नाही. काही वर्षांपूर्वी जंगलमहाल या नक्षलींच्या हॉटस्पॉटमध्ये किशनजी हा जहाल नक्षलवादी चकमकीत ठार झाला होता. त्यानंतर, नक्षलवादी निष्क्रिय झाल्याने किंवा त्यांनी नजीकच्या झारखंडमधील जंगलात पलायन केल्याने जंगलमहालमध्ये शांतता पसरली होती. त्याचप्रमाणे, मोफत रेशन, स्थानिकांना नोकरीच्या संधी, मोफत सायकल आणि सौरऊर्जेमुळेही परिस्थितीत फरक पडला होता. 

  • २० ते २५ नक्षलवाद्यांची रात्रभर बैठक 
  • सुरक्षा दलांना बैठक रोखण्यात अपयश
  • अनेक गावांमध्ये नक्षलवाद्यांकडून काळे झेंडे, लाल शाईतील पोस्टर

केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या माघारी
नक्षलवाद्यांच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुकड्या पुन्हा तैनात करण्यात येणार आहेत. राज्यातील परिस्थिती सुधारल्याचे सांगत केंद्राने वर्षभरापूर्वी या तुकड्या परत घेतल्या होत्या. राज्य सरकारने या निर्णयाचा निषेधही केला होता. या तुकड्या काश्मिरमध्ये तैनात करण्यात आल्या. प.बंगालमधील परिस्थिती सुधारल्यामुळे केंद्रीय सुरक्षा दलाच्या आणखी तुकड्या माघारी घेतल्या जातील, असे केंद्राने राज्याला सांगितले होते. त्यावर प.बंगाल सरकारनेही केंद्राला पत्र पाठविले होते. 

संबंधित बातम्या