भांडी घडवण्‍याच्‍या पोखरणच्या प्राचीन कलेचे पुनरुज्जीवन

pib
सोमवार, 22 जून 2020

यंत्रामुळे भांडी निर्मितीच्या प्रक्रियेतले कष्ट कमी होऊन कुंभारांच्या उत्पन्नातही 7 ते 8 पटींनी वाढ झाली आहे.

नवी दिल्ली,

राजस्थान मधल्या जैसलमेर जिल्ह्यातल्या  पोखरण या छोट्या गावातल्या प्रसिध्द भांडी तयार करण्याच्या कलेला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने केव्हीआयसी, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आज 80 कुटुंबाना 80 इलेक्ट्रिक मातीकाम चाकांचे वितरण केले. भारताची पहिली अणुचाचणी झालेल्या या गावाला टेराकोटा उत्पादनांची समृध्द परंपरा लाभली आहे. पोखरणमधे 300 कुंभार कुटुंबे अनेक दशके ही भांडी तयार करण्याच्या कामात आहेत.मात्र यातले प्रचंड कष्ट आणि बाजारपेठेचा आधार नसल्याने ही कुटुंबे चरितार्थासाठी  इतर मार्गाच्या शोधात होती.

इलेक्ट्रिक चाकांबरोबरच केव्हीआयसीने माती मिश्रणासाठीच्या 8 यंत्रांचेही वाटप केले. या यंत्रामुळे 800 किलो मातीचे  8 तासातच मिश्रण करता येते. भांडी करण्यासाठी लागणारी ही माती कुंभारांनी  हातानी मळायची ठरवल्यास 800 किलो मातीसाठी त्यांना 5 दिवस लागतात. केव्हीआयसीने गावात 350 थेट रोजगार निर्माण केले आहेत. या 80 कुंभाराना केव्हीआयसीने 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले असून त्यांनी उत्कृष्ट भांडी घडवली आहेत. कुल्हड पासून ते फुलदाणी,मूर्ती, पारंपरिक भांडी, स्वयंपाकासाठी तसेच शोभेच्या वस्तु अशा विविध प्रकारच्या वस्तू हे कारागीर घडवतात.

कुंभारानी अतिशय कल्पकतेने आपल्या कलेतून स्वच्छ भारत अभियान आणि आंतरराष्ट्रीय योग दिन साकारला.

पंतप्रधानांनी साद घातल्याप्रमाणे आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी, स्वयं रोजगार निर्माण करून कुंभाराना बळकट करण्यासाठी आणि त्याच बरोबर नष्ट होत जाणारी ही कला पुनरुज्जीवित करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी  इलेक्ट्रिक चाक आणि इतर साहित्याचे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे वाटप केल्यानंतर सांगितले.

पोखरण आतापर्यंत अणू चाचणीचे स्थान यासाठी ओळखले जात होते आता लवकरच उत्कृष्ट भांडी तयार होणारे स्थान अशी नवी  ओळख निर्माण होईल. कुंभार सशक्तीकरण योजनेंतर्गत कुंभार समुदायाला मुख्य प्रवाहात परत आणण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यांना आधुनिक साहित्य आणि प्रशिक्षण पुरवून समाजाशी परत जोडत कलेला पुनरुज्जीवित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सक्सेना यांनी सांगितले.

या कुंभाराना बाजारपेठेचे सहाय्य मिळावे यासाठी बारमेर आणि जैसलमेर रेल्वे स्थानकांवर या भांड्यांची विक्री आणि विपणन सुलभ करण्याच्या सूचना त्यांनी केव्हीआयसीच्या राजस्थान राज्य संचालकांना केली. पोखरण हे नीती आयोगाने निश्चित केलेल्या आकांक्षी जिल्ह्यांपैकी एक आहे. 400 रेल्वे स्थानकांवर खाण्याच्या वस्तूची  केवळ मातीच्या /टेराकोटाच्या भांड्यात विक्री केली जाते त्यामध्ये बारमेर आणि जैसलमेरचा समावेशअसून ही ठिकाणे पोखरण जवळ आहेत.

राजस्थान, उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरियाणा, पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात, तमिळनाडू, ओदिशा, तेलंगण, बिहार मधल्या अनेक दुर्गम भागात केव्हीआयसीने कुंभार सशक्तीकरण योजना सुरु केली आहे. राजस्थान मधे जयपूर, कोटा, श्री गंगासागर यासारख्या बारापेक्षा जास्त जिल्ह्यांना या कार्यक्रमाचा लाभ होत आहे.

या योजने अंतर्गत केव्हीआयसी माती मिश्रणासाठी यंत्र आणि भांडी तयार करण्यासाठी इतर साहित्य पुरवते. 

संबंधित बातम्या