बिहारमध्ये नितीश कुमार सरकार संकटात!; १७ आमदार संपर्कात असल्याचा 'राजद'चा दावा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 30 डिसेंबर 2020

तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने नितीश कुमार यांच्या पक्षाचे १७ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. राजदचे जेष्ठ नेते श्याम रजक यांनी हा दावा केला आहे.  

पाटणा- बिहारच्या राजकारणात निवडणुकीआधीही आणि निवडणुकीनंतरही अनेक उलथापालथ घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अरूणाचल प्रदेशातील जेडीयुच्या ७ आमदारांपैकी ६ आमदार भाजपवासी झाल्यानंतर बिहारमध्येही राजकीय वातावरण अतिशय तापले होते. आता, तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने नितीश कुमार यांच्या पक्षाचे १७ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. राजदचे जेष्ठ नेते श्याम रजक यांनी हा दावा केला आहे.  

 संपर्कात असलेले जेडीयुचे आमदार कधीही राजदमध्ये दाखल होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. राजदने दावा केलेल्या संख्येएवढे आमदार जर पक्ष सोडून जात असतील तर बिहारमधील एनडीएचे सरकार कोसळू शकते. हे आमदार राजदमध्ये  झाल्यास राजद स्वबळावर आपले  सरकार स्थापन करू शकते. जेडीयुकडून मात्र, या अफवा असल्याचे सांगितले आहे.    
  
निवडणुकीआधी जेडीयुत होते राजद नेते श्याम रजक

 बिहार सरकारमधील माजी मंत्री आणि राजद नेते श्यान रजक यांनी हा दावा केला आहे. त्यांनी राजकीय कारकिर्दिच्या सुरूवातीस अनेक वर्षे लालू प्रसाद यादव यांच्या राजद यांच्या पक्षात काढले. नितीश कुमार सत्तेत आल्यानंतर ते जेडीयुत दाखल झाले होते. जेडीयु सरकारमध्ये त्यांनी अनेक मंत्रालयांची जबाबदारी पेलली आहे. मात्र, नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी आपले मंत्री पद आणि जेडीयुची प्राथमिक सदस्यता यांचा राजीनामा देत आपल्या जुन्या पक्षात पुन्हा घरवापसी केली होती.  
 
पक्षांतरबंदी कायदा लागू नये म्हणून आणखी काही आमदारांची आवश्यकता

सद्यस्थितीत जेडीयुचे १७ आमदार आपल्या संपर्कात असल्याचे राजद नेते श्याम रजक यांनी सांगितले आहे. ते सरळ राजदमध्ये येण्यास तयार आहेत.  मात्र, त्यांच्यावर पक्षांतरबंदीच्या कारवाईचा बडगा उठू नये म्हणून त्यांना वाट बघण्यास सांगण्यात आले आहे. हा कायदा लागू होऊ नये म्हणून जेडीयुच्या दोनतृतीयांश आमदारांना पक्ष सोडावा लागेल. सध्या बिहार विधानसभेत जेडीयुचे ४३ आमदार असून राजद नितीश कुमार यांच्या जेडीयुचे आणखी काही आमदार फोडण्याच्या तयारीत असल्याचे श्याम रजक यांनी सांगितले. 
 

संबंधित बातम्या