आरटी-एलएएमपी ही एक जलद, अचूक आणि प्रभावी चाचणी पद्धत

Pib
बुधवार, 27 मे 2020

याकरिता सीएसआयआर-आयआयआयएम जम्मू आणि आरआयएल मध्ये एक औपचारिक सामंजस्य करार देखील झाला आहे.

नवी दिल्ली, 

देशात कोविड-19 ची तीव्रता कमी करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून, सीएसआयआरने देशात कोरोना विषाणूच्या साथीचा सामना करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा विकास, एकत्रीकरण, प्रोत्साहन आणि उपयोग करण्यासाठी संशोधन आणि विकास हाती घेण्याचे धोरण आखले आहे. कोरोना विषाणूने निर्माण केलेल्या बहुविध समस्यांचा विचार करता त्यामध्ये  तंत्रज्ञान वापर आवश्यक आहे, सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी डिजिटल आणि आण्विक देखरेख ठेवणे, औषधे आणि लसीकरण, जलद आणि किफायतशीर निदान, रुग्णालयातील सहाय्यक उपकरणे आणि पीपीई, पुरवठा साखळी व लॉजिस्टिकमध्ये विविध संशोधन कार्यांचा समन्वय साधण्यासाठी पाच कार्यक्षेत्रं निश्चित केली आहेत.

कोविड-19 ची तीव्रता कमी करण्याच्या प्रक्रियेत चाचणी हा एक मुख्य घटक असल्याने, एक नवीन ‘रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस-लूप मेडिएटेड इस्थोर्मल एम्प्लीफिकेशन’ (आरटी-एलएएमपी) आधारित कोविड-19 निदानसूचक कीट विकसित करून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सीएसआयआर ची एक घटक प्रयोगशाळा असणाऱ्या सीएसआयआर-आयआयआयएम जम्मूने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसोबत भागीदारी केली आहे. 

कोविड-19 आरटी-एलएएमपी चाचणी ही एक न्यूक्लिक ऍसिड आधारित चाचणी आहे जी रुग्णाच्या नाक/घशाच्या स्वाब नमुन्यांमधून घेतली जाते. कृत्रिम टेम्पलेट वापरुन चाचणी प्रक्रिया विकसित केली आणि ती यशस्वी झाली. ही जलद, (45-60 मिनिटे) प्रभावी आणि अचूक चाचणी आहे. ही चाचणी सध्या कमी रुग्णांच्या नमुन्यांसह घेतली जात असून हे कीट मोठ्या संख्येने रुग्णांच्या नमुन्यांवर वैध ठरविण्याचे नियोजन केले जात असून ते आरआयएलच्या सहकार्याने पूर्ण केले जाईल.

या चाचणीचा फायदा असा आहे की आरटी-एलएएमपी आधारित कोविड -19 कीट घटक सहज उपलब्ध आहेत आणि हे भारतात पूर्णपणे तयार केले जाऊ शकतात. सध्याची  कोविड-19 चाचणी रिअल-टाइम पीसीआरद्वारे केली जाते ज्याचे बहुतेक घटक आयात केलेले असतात.  याव्यतिरिक्त, या चाचण्या महाग आहेत; ज्यांना उच्च प्रशिक्षित मनुष्यबळ, महागडी उपकरणे आणि तुलनेने उच्च प्रतीच्या प्रयोगशाळांची आवश्यकता असते आणि दुर्गम ठिकाणी, विलगीकरण केंद्रे, विमानतळ आणि रेल्वे स्टेशन इत्यादींमध्ये त्या स्थापन करू शकत नाहीत.

दुसरीकडे, आरटी-एलएएमपी चाचणी एकाच ट्यूबमध्ये अगदी विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी मोबाइल युनिट्स / किओस्कसारख्या अगदी प्राथमिक प्रयोगशाळेतील संरचनेत कमीत कमी तज्ज्ञांसह केली जाऊ शकते. चाचणीचा अंतिम निकाल शोधण्यासाठी, एक साधी सोपी रंगाची प्रतिक्रिया आहे, जी अतिनील प्रकाशात सहजपणे दिसून येते आणि आता त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत जेणेकरून ते नियमित/नेहमीच्या प्रकाशात देखील मिळू शकेल.

किटच्या अचूकतेची तपासणी केल्यानंतर, मोठ्या संख्येने रूग्णांवर चाचणी घेण्यासाठी, सीएसआयआर-आयआयआयएम आणि आरआयएल संयुक्तपणे आयसीएमआरकडे मंजुरीसाठी संपर्क साधतील. देशाची मोठी लोकसंख्या लक्षात घेत वेगवान चाचणी प्रक्रिया आणि समाजाचे व्यापक हित लक्षात घेऊन कोविड-19 चा तपास करण्यासाठी सोपी, जलद आणि व्यापक निदान प्रक्रिया आणण्याची आरआयएलची योजना आहे.

आरटी-एलएएमपी-आधारित नैदानिक चाचण्यांच्या औपचारिक सुरुवाती नंतर, कोविड-19 ची चाचणी केवळ अधिक जलद, स्वस्त, सोपे आणि सुगम होणार नाही, तर संक्रमित व्यक्तींची अलगीकरण केंद्रात ठेवण्याची प्रक्रिया जलद होऊन विषाणूचा प्रसार कमी होण्यास देखील बऱ्याच अंशी मदत होईल.

संचालक डॉ. राम विश्वकर्मा आणि सीएसआयआर-आयआयआयएमचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. सुमीत गांधी आणि संशोधन आणि विकास विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. शंतनू दासगुप्ता आणि आरआयएलचे महाव्यवस्थापक डॉ. मनीष शुक्ला या प्रकल्पाचे निरीक्षण करीत आहेत.

संबंधित बातम्या