''मृत नातेवाईकाच्या जागी विवाहित मुलीला देखील नोकरीत समान हक्क'' 

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागी मुलाप्रमाणे मुलीलाही नोकरीमध्ये समान हक्क देण्यात यावे असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले आहे.

कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागी मुलाप्रमाणे मुलीलाही नोकरीमध्ये समान हक्क देण्यात यावे असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले आहे. एका याचिकेवर निकाल देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुलगी अविवाहित किंवा विवाहित असली तरी कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर मुलाप्रमाणे मुलीला देखील नोकरीत समान हक्क देण्याचे आदेशात म्हटले आहे. त्याशिवाय मृत अवलंबित कोटाच्या (Deceased Dependent Quota) नियमांमध्ये असलेल्या अविवाहित या शब्दाचा अर्थ फक्त पुरुषांसाठी गृहीत धरणे चुकीचे असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले असून, अविवाहित शब्दाची व्याख्या स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळी करणे म्हणजे भेदभाव केल्याप्रमाणेच असल्याचे म्हटले आहे. तसेच हे कायद्याशी सुसंगत नसल्याचे देखील अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले.   

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील शिक्षण विभागातील प्रकरणासंदर्भात महिलेने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना, मृत्यू झालेल्या नातेवाईकाच्या जागी नोकरीसाठी महिलेचा विवाह झालेला आहे म्हणून तिचा अर्ज रद्द करता येणार नसल्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याव्यतिरिक्त हे प्रकरण पुढील दोन महिन्यांच्या आत निकाली काढण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.  

येडियुरप्पा सरकारमध्ये सात नव्या मंत्र्यांचा समावेश 

अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायमूर्ती जे. जे. मुनीर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. त्यावेळी निकाल देताना नोकरीसाठी मुलीला देखील समान हक्क देणे गरजेचे असल्याचे मत न्यायमूर्ती जे. जे. मुनीर यांनी नोंदवले. याशिवाय मृत अवलंबित कोटाच्या (Deceased Dependent Quota) नियमांमध्ये बदल करणे देखील गरजेचे असून, काही शब्दांच्या वेळेस व्यक्तीमध्ये स्त्री आणि पुरुष भेदभाव न करण्याचे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.  
 
मंजुल श्रीवास्तव असे याचिका दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. मंजुल यांची आई विमला श्रीवास्तव एका शाळेत शिक्षिका होत्या. विमला श्रीवास्तव यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. त्यानंतर मंजुल श्रीवास्तव यांचे पती आणि वडील बेरोजगार असल्यामुळे त्यांनी आईच्या जागेवर नोकरी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र मंजुल श्रीवास्तव यांचा विवाह झाला असल्याकारणामुळे त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता.  

 

संबंधित बातम्या