'राहुल गांधी नव्हे हे तर राहुल लाहोरी'

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे थरुर हे उजवे हात मानले जातात, तेव्हा त्यांची भूमिका या दोन्ही नेत्यांना मान्य आहे का आणि तसे असेल तर राहुल पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवणार का, असे सवाल पात्रा यांनी विचारले.

नवी दिल्ली - पाकिस्तानातील वेब संवादात भारताची प्रतिमा खराब करणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे नेते असलेले राहुल गांधी हे पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवणार आहेत का, असा तिखट सवाल भाजपने आज विचारला. हे असेच चालू राहिले तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लवकरच पाकिस्तान राष्ट्रीय काँग्रेसमध्ये परावर्तीत होईल, अशी टीका करताना सत्तारूढ भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला. त्यांनी राहुल गांधींचा उल्लेख उपरोधिकपणे ‘राहुल लाहोरी’ असा केला.

थरुर यांनी नुकतेच पाकमधील ऑनलाइन संवादात ईशान्य भारतीयांना उर्वरित देशात मिळणारी वागणूक तसेच तबलीगी जमातीबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. यामुळे भाजपचा संताप झाला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे थरुर हे उजवे हात मानले जातात, तेव्हा त्यांची भूमिका या दोन्ही नेत्यांना मान्य आहे का आणि तसे असेल तर राहुल पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवणार का, असे सवाल पात्रा यांनी विचारले.

ते म्हणाले, ‘‘राहुल गांधींना भारताची घृणा आहे. त्यामुळे ते सतत शेजारच्या देशांबद्दल चांगल्या पद्धतीने आणि भारताला अपमानास्पद वाटेल अशी विधाने करत असतात. अखेर काँग्रेस आणि पाकिस्तान यांचे नाते नेमके आहे तरी काय? असा सवाल वारंवार उपस्थित व्हावा असे त्या पक्षाच्या नेत्यांचे वागणे आणि बोलणे असते हे भारताचे दुर्दैव आहे.’’

तबलीगी जमातीचा उल्लेख पाकिस्तानमध्ये करून भारतातील सरसकट मुसलमानांच्या अवस्थेबद्दल बोलण्याचा अधिकार थरूर यांना त्यांच्या पक्षाने दिला काय? ते पाकिस्तानात जाऊन राहुल यांना क्रेडिट देऊ इच्छितात काय? असा सवाल करून पात्रा पुढे म्हणाले की, भारताइतकी लोकशाही आणि नागरिक स्वातंत्र्य अधिकार जगात इतरत्र नाही.

संबंधित बातम्या