कोरोनावर चर्चा अन् पापड!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

राज्यसभेत टीका अन् प्रत्युत्तर

नवी दिल्ली: ,आपल्या १३५ कोटींच्या देशात लस ही जादूची कांडी ठरू शकत नाही. त्यामुळे मास्क, सामाजिक अंतरभान, हात स्वच्छ करणे व सॅनिटायजर ही चतुःसूत्री पाळणे अत्यावश्‍यक आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्यसभेत सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रात हजारो लोक कोरोनामुक्तही झाले आहेत. इतके सारे लोक  ‘काय भाभीजी के पापड खाऊन बरे झाले का?’ अशा शब्दांत शिवसेनेचे संजय राऊत यांनी भाजपला धारेवर धरले.

केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी बिकानेरचे भाभीजी के पापड खाऊन कोरोना बरा होतो, असे अचाट वक्तव्य केले होते. त्याचा राऊत यांनी आज भाजपविरुद्ध चपखलपणे वापर केला. ही राजकीय नाही तर लोकांचे जीव वाचविण्याची लढाई असल्याचे सांगून राऊत यांनी, आपली ८० वर्षीय आई व छोटा भाऊ कोरोनाग्रस्त झाल्याने अतिदक्षता विभागांत उपचार घेत असल्याचे सांगितले. राऊत यांना प्रत्युत्तर देताना भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांनी, चरखा चालवून इंग्रज देशातून गेले का? असा प्रतिप्रश्‍न केला. अशा मोठ्या लढायांत चरखा, दिवे, ताली-थाळी ही केवळ प्रतीके असतात हे टीका करणारांनी समजून घ्यावे, असा टोला त्यांनी लगावला. 

धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही मुंबई नगरपालिकेची प्रशंसा केली आहे व येथे काही सदस्यांनी केवळ पक्षीय आकसातून महाराष्ट्र सरकारवर टीका केली.

देशात १७०० प्रयोगशाळा उभारल्या
लॉकडाउनच्या काळातही देशात १७०० तपासणी प्रयोगशाळा उभ्या राहिल्या. केंद्राने कोणताही भेदभाव न करता राज्यांना सातत्याने मदत केली आहे. पीपीई किट तयार करणाऱ्या ११० कंपन्या, २५ व्हेंटिलेटर्स उत्पादक कंपन्या व १० मास्क उत्पादक सध्या आहेत. लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजुरांना त्रास झाल्याची कबुली डॉ. हर्ष वर्धन यांनी देऊन ते म्हणाले, की ६४ लाख मजुरांना विशेष रेल्वेगाड्या चालवून त्यांच्या घरी पोचवले. 

‘आम्ही मान्य करू, असे होणार नाही!
कृ  षीविषयक तीन विधेयकांना भाजपचा घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने कडाडून विरोध केला आहे. ‘ते (भाजप) काहीही सांगतील व आम्ही ते मान्य करू, असे होणार नाही,’ अशा शब्दांत अकाली दलाचे नेते व राज्यसभा खासदार बलविंदरसिंग भुल्लर यांनी संताप व्यक्त केला. 
केंद्राने जीवनावश्‍यक वस्तू कायदादुरुस्ती, व्यापार व वाणिज्य (संवर्धन-सुविधा) व शेतकरी करार-सशक्तीकरण व संरक्षण (कंत्राटी शेती) ही विधेयके संसदेत मांडण्यासाठी सज्ज ठेवली आहेत. ही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची असून याआधी कॉंग्रेसने तिन्ही अध्यादेशांना जाहीर पाठिंबा दिला होता, असा दावा भाजपने केला आहे.   
भुल्लर म्हणाले, की भाजपबरोबर युती आहे याचा हा अर्थ नाही, की त्यांनी काहीही सांगितले की मान्य करायचे. हे चालणार नाही. ही विधेयके अन्याय करणारी असल्याची शेतकऱ्यांची भावना झालेली आहे.

संबंधित बातम्या