ISRO ने रचला इतिहास, EOS-01 चे यशस्वी प्रक्षेपण

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज पुन्हा एकदा अवकाशात यशस्वी झेप घेतली. येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पृथ्वी निरीक्षण उपग्रह ‘ईओएस-०१’ सह अन्य नऊ परकीय उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

श्रीहरिकोटा :  भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज पुन्हा एकदा अवकाशात यशस्वी झेप घेतली. येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पृथ्वी निरीक्षण उपग्रह ‘ईओएस-०१’ सह अन्य नऊ परकीय उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारताने सोडलेल्या निरीक्षण उपग्रहाचा वापर हा लष्करी कामांसाठी देखील केला जाणार असून याच मालिकेतील आणखी दोन उपग्रहे लवकरच झेपावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या माध्यमातून ही उपग्रहे अवकाशात सोडण्यात आली. या प्रक्षेपणाला निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे उशीर झाला होता.

चालू वर्षातील इस्रोची ही पहिलीच भरारी असल्याचे बोलले जाते. या यशानंतर शास्त्रज्ञांशी संवाद साधताना इस्रोचे चेअरमन डॉ. के. सिवान म्हणाले की, ‘‘ दिवाळीच्या आधीच तुम्ही रॉकेट सोडले आहे. आता खरा उत्सव सुरू होईल. अंतराळाशी संबंधित प्रत्येक गोष्ट आम्हाला वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून करता येत नाही. एखाद्या मोहिमेसाठी अभियंते, संशोधक यांना येथे हजर राहावेच लागते.’’ सायंकाळी ३.१२ च्या सुमारास या उपग्रहांना घेऊन प्रक्षेपकाने अवकाशात झेप घेतली त्यानंतर अलगदपणे उपग्रहांना पृथ्वीच्या कक्षेमध्ये सोडले. इस्रोने या आधी जानेवारी महिन्यामध्येच ‘जीसॅट-३०’ दूरसंचार क्षेत्रातील उपग्रहाचे प्रक्षेपण केले होते पण हे प्रक्षेपण फ्रान्समधील गुयाना येथून करण्यात आले होते. या यशस्वी भरारीनंतर आता इस्रोकडून अवकाशात पाठविण्यात आलेल्या परकीय उपग्रहांची संख्या ३२८ वर गेली आहे.

‘ईओएस०१’ ची वैशिष्ट्ये
हा रडार इमेजिंग उपग्रह आहे. सिंथेटिक अपार्चर रडार ढगांच्या पल्याड देखील पाहू शकतो. दिवस- रात्र प्रत्येक ऋतूमध्ये त्याला फोटो काढता येणे शक्य होणार आहे. देशाच्या सीमांवर देखील या माध्यमातून नजर ठेवता येईल. शेती, वने, मातीमधील आर्द्रता यांचा शोध घेण्यासाठी देखील या उपग्रहाचा वापर होईल. आपत्ती व्यवस्थापनामध्ये देखील या उपग्रहाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल.

"या यशाबद्दल इस्रो आणि भारतीय अंतराळ उद्योगाचे अभिनंदन. कोरोनाच्या काळामध्ये असंख्य आव्हानांना सामोरे जात आमच्या शास्त्रज्ञांनी डेडलाईन पाळत हे यश संपादन केले आहे."
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

संबंधित बातम्या