काँग्रेसच्या कुटील प्रयत्नांना धक्का

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

पीएम केअर्ससंदर्भात सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानंतर भाजपची टीका

नवी दिल्ली:  कोरोना लढाईसाठी नरेंद्र मोदी सरकारने स्थापन केलेल्या पंतप्रधान केअर्स निधीतील रक्कम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीमध्ये वळविण्यास नकार देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर चौफेर हल्ला चढवला आहे. या निकालाने राहुल गांधी व कॉंग्रेसचे साथीदार यांच्या कुटील, दुष्ट प्रयत्नांना धक्का लागला, अशी टीका भाजपने केली आहे. पीएम केअर्स निधीचा संपूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध असून लेखापरीक्षणही होणार आहे, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. 

सरकार प्रामाणिकपणे काम करण्यासाठीच ओळखले जाते, असे सांगून प्रसाद म्हणाले की या स्वैच्छिक निधीतील प्रत्येक पैशाचा हिशोब सार्वजनिक केला जात आहे व यापुढेही तसेच केले जाईल. राहुल कोरोनाविरुद्धची  लढाई कमकुवत करण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून जोरदार प्रयत्न करत आहेत. 

एका कुटुंबाची मालमत्ता असलेल्या राजीव गांधी फौंडेशनला चीनने निधी दिल्यावर त्या संस्थेने तयार केलेल्या अहवालात हे स्पष्टपणे म्हटले होते, की संबंध सुधारण्यासाठी चीनसाठी भारताची बाजारपेठ खुली करायला हवी, असे प्रसाद यांनी सूचकपणे नमूद केले. 

संबंधित बातम्या