इंग्रजी प्रशिक्षणातून लाखोंचा अपहार

उज्ज्वल कुमार
शुक्रवार, 17 जुलै 2020

बिहारमधील सरकारी सचिवांसह सनदी अधिकाऱ्यांवर ‘एफआयआर’

पाटणा

बिहारमध्ये मागासवर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. मागास वर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषणाचे प्रशिक्षण देण्याची मुख्यमंत्री नितीश कुमार यांची महत्त्वाकांक्षी योजना होती. या प्रकरणी सनदी अधिकारी एस. एम. राजू यांच्यासह दहा जणांवर बुधवारी (ता. १५) रात्री उशिरा ‘एफआयआर’ दाखल करण्यात आली.
तपास संस्थेच्या चौकशीतून हा गैरव्यवहार उघड झाला. यात ‘ब्रिटिश लिंग्वा’ या इंग्रजी संभाषण संस्थेचे संचालक डॉ. बिरबल झा, एससी-एसटी कल्याण विभागाचे तत्कालीन सचिव एस. एम. राजू व तीन सेवानिवृत्त सनदी अधिकारी (तत्कालीन योजनेचे संचालक) व बिहार राज्य महादलित विकास मिशनचे काही पदाधिकाऱ्यांची नावे पुढे आली. राजू यांच्यासह दहा जणांवर काल ‘एफआयआर’ दाखल करण्यात आली आहे. राजू या महिन्यात निवृत्त होणार आहेत. या पूर्वी एससी-एसटी कल्याण विभागात झालेला मागास छात्रवृत्तीमधील गैरव्यवहारातही ते मुख्य आरोपी होते.
मागासवर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषणाचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘ब्रिटिश लिंग्वा’ नावाच्या संस्थेशी एससी-एसटी कल्याण विभागाने करार केला होता. परंतु विभागीय सचिव आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने १४ हजार ८२६ विद्यार्थ्यांची बनावट नावे, पत्ता आणि अन्य माहिती देऊन सात कोटी ३० लाख १३ हजारपेक्षा जास्त सरकारी निधी हडप केला. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवायच्या नावे पैसे घेतले, त्यांची नावे व पत्ते चुकीचे होते. काही विद्यार्थ्यांची नावे दुसऱ्या प्रशिक्षण संस्थेतही आढळली. एकाच वेळ, एकाच ठिकाणी एकपेक्षा जास्त अभ्यासक्रम विद्यार्थी शिकत असल्याचे आढळले. इंग्रजीच्या वर्गात असताना विद्यार्थी अन्य वर्गात कसे असतील, अशी शंका आल्यानंतर हा अपहार उघडकीस आला.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या