कोरोनानंतर 'वटवाघूळ' आता अजून एक आजार आणणार आहे?; ४ संशोधक करताहेत रात्रंदिवस अभ्यास

गोमंतक ऑनलाईन टीम
सोमवार, 14 डिसेंबर 2020

कोरोनाचा प्रसार नेमका कसा झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, हा आजार वटवाघळांपासून पसरल्याचे काही संशोधकांचे म्हणणे आहे. यावर पुढील संशोधन अजून सुरूच आहे.

नवी दिल्ली- मागील वर्षभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनापासून जग अजून सावरले देखील नाही. जगातील एकूण 7 कोटी 27 लाख लोकांना या आजाराने ग्रासले असून जवळपास 16 लाखांहून अधिक लोकांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. कोरोनाचा प्रसार नेमका कसा झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, हा आजार वटवाघळांपासून पसरल्याचे काही संशोधकांचे म्हणणे आहे. यावर पुढील संशोधन अजून सुरूच आहे.
  
ब्राझील सरकारच्या फियोक्रूज संस्थानाकडून जंगली प्राण्यांमध्ये आढळणारे व्हायरस एकत्र करण्यासाठी त्यावर संशोधनाची एक मोहिम मागील महिन्यात काढण्यात आली. हे काम रात्री चालत असून तेथील वैज्ञानिक रात्रीच्या अंधारात तेथे 'पेड्रा ब्रांका स्टेट पार्क' येथील घनदाट जंगलात वटवाघळांना पकडायला निघतात. त्यांच्यावर संशोधन करण्यासाठी त्यांना पकडण्यात येते. 

दरम्यान, पकडण्यात आलेल्या वटवाघळांची ओळख पटण्यासाठी त्यांच्यावर संशोधन करण्यात येते. त्यांच्यापासून पुढील काळात आपल्याला काही धोका आहे याची पडताळणी करण्यात येते. कारण भविष्यात वटवाघळांपासून पसरणाऱ्या आजारांपासून सावध राहून त्या आजारांना वेळीच आळा घालता येईल. 

सार्स, मर्स, इबोला, निपाह आणि हेंड्रस यांसारख्या घातक विषाणूंच्या पसारामागे वटवाघूळ असल्याचे अनेक संशोधनांमधून समोर आले आहे. त्यासाठी शास्त्रज्ञ याच प्राण्यांच्या संशोधनावर जास्त लक्ष केंद्रित करत असून पुढील महामारीपासून जगाच्या संरक्षणासाठी जगभरात अनेक ठिकाणी अभ्यास केला जात आहे. 

संबंधित बातम्या