बंगळूर हिंसाचारामागे एसडीपीआय

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

गृहमंत्री बोम्मई : एसडीपीआयकडून मात्र खंडण, संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल

बंगळूर

शहरात मंगळवारी रात्री झालेल्या दंगलीच्या पोलिस चौकशीत सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) चा हात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील चार सदस्यांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी दिली. दरम्यान, सोशल मीडियावर अपमानकारक पोस्ट व्हायरल केल्याच्या आरोपावरून आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचे पुतणे पी. नवीन याच्याविरुध्द व हिंसाचारत हात असल्याच्या आरोपावरून एसडीपीआयच्या काही कार्यकर्त्यांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत 140 जणांना अटक केली आहे.
पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री म्हणाले, "बंगळूरमधील दंगलीच्या घटनेची चौकशी सुरू असून नवीन पैलू समोर येत आहेत. मी आता सारेच काही सांगू शकत नाही. भविष्यात साऱ्या गोष्टी स्पष्ट होतील. परंतु व्हिडीओ फुटेज आणि अन्य पुराव्यांसह एसडीपीआयची भूमिका समोर आली आहे. आम्ही सखोल चौकशी करीत आहोत. एसडीपीआयच्या काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.' 
मंत्री बोम्मई म्हणाले, "अटक करण्यात आलेल्या एसडीपीआयच्या चार सदस्यांमध्ये पक्षाचे जिल्हा सचिव मुजम्मिल पाशा याचाही समावेश आहे. आम्ही काही व्हिडिओ फुटेजवरून असेही पाहिले आहे की, एसडीपीआयचे कार्यकर्ते शेजारच्या भागातून के.जी. हळ्ळी आणि डी.जे. हळ्ळीमध्ये आले. याचीही आम्ही चौकशी करीत आहोत. म्हैसूर आणि मंगळूर येथील एसडीपीआयविरोधातील खटल्यांबाबत अधिकाऱ्यांकडूनही माहिती दिली जात आहे. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. यामागे कोण आहे याची पर्वा न करता आम्ही या षडयंत्राच्या खोलापर्यंत जाऊ.  स्थानिक पातळीवर, राजकीय पक्षांमधील अंतर्गत स्पर्धेचाही आम्ही शोध घेत आहोत. या घटनेला कारणीभूत असलेल्या प्रत्येक गोष्टीची चौकशी करू. ज्याची चूक असेल, मग ते निवडून आलेले लोकप्रतिनिधी असले तरी आम्ही त्यांची गय करणार नाही.'
दरम्यान, एसडीपीआयने या हिंसाचारात आपला हात नसल्याचे म्हटले आहे. एसडीपीआय कर्नाटकचे अध्यक्ष इलियास मुहम्मद थुंबे म्हणाले की, "जमावाला शांत करण्याच्या कामात पाशा पोलिसांना मदत करत होते. नेहमीप्रमाणे, पोलिसांची निष्क्रियता लपविण्यासाठी एसडीपीआयला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे.' मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांच्या गोळीबारात तीन लोक मरण पावले आणि पाच जखमी झाले. सोशल मीडियावरील विशिष्ठ धर्माच्या वादग्रस्त पोस्टमुळे लोक भडकले. ही पोस्ट पुलकेशीनगरचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचे पुतणे पी. नवीन यांनी केल्याचा आरोप आहे. दंगल सुरू असताना आमदार मूर्ती यांच्या घराला आग लावण्यात आली आणि के.जी. हळ्ळी पोलिस ठाण्यावर हल्लाही झाला.

आमदार पुतण्यावर गुन्हा
आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचे पुतणे पी. नवीन याने मंगळवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याचा आरोप आहे. त्यामुळे देवरजीवनहळ्ळी पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 153 ए (विविध कारणांमुळे शत्रुत्व वाढवणारे) आणि 294 ए (धार्मिक भावनांचा द्वेष करण्याच्या हेतूने धार्मिक श्रद्धांचा अपमान करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा नोंदविला.

140 जण अटकेत
मंगळवारी झालेल्या जाळपोळ, तोडफोड आणि दंगलप्रकरणी डी. जे.हळ्ळी पोलिसांनी भारतीय सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) चे अफलन, मुझमिल पाशा, सय्यद मसूद, अयाज आणि अल्लाबक्ष यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्याशिवाय पोलिसांनी मंगळवारी झालेल्या हिंसक जमावात भाग घेतलेल्या 200 जणांवरही गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत 140 जणांना अटक करण्यात आली आहे.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या