पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 1 एप्रिल 2021

देशात आजपासून (1 एप्रिल) पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणूक होत आहेत. या ठिकाणी 30 आमदार आपले नशीब आजमावत आहेत.

कोलकाता, गुवाहाटी :  देशात आजपासून (1 एप्रिल) पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणूक होत आहेत. या ठिकाणी 30 आमदार आपले नशीब आजमावत आहेत. तर नंदीग्राम मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सूवेंदू अधिकारी यांच्यातील संघर्षदेखील शिगेला पोहचला आहे.  नंदीग्राममध्ये 50 हजार मतांनी ममता बॅनर्जी यांना पराभूत केले नाही तर आपण राजकारण सोडून देऊ, अशी शपथ सूवेंदू अधिकारी यांनी घेतली आहे. 

पश्चिम बंगालच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत 171 उमेदवारांपैकी 152 पुरुष उमेदवार तर 11 महिला उमेदवारांचा समावेश आहे.  मतदानाला सकाळी 8 वाजता सुरवात झाली असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.  गोसाबा, पाथरप्रतिमा, काकद्वीप, सागर, तामलूक, पानस्कुरा (204), पानस्कुरा (205), मोयना, नंदकुमार, महिषादल, हल्दिया, नंदीग्राम यांसह इतर मतदार संघात निवडणुक प्रक्रिया पार पडत आहे. तर 2 मे रोजी मतदानाचे निकाल लागणार आहेत. 

तर दुसरीकडे, आसाम राज्यातही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसर्‍या टप्प्यात आसाममध्ये 39  मतदारसंघात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 126 उमेदवारांसाठी  47  मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. दुसऱ्या टप्प्यात चार मंत्री आणि आसाम विधानसभेचे उपसभापती यांच्यासह सुमारे 345 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान सकाळी 7 वाजता  सुरू झाले असून सायंकाळी 7 वाजता संपणार आहे.  माजी उपसभापती दिलीपकुमार पॉल यांनी भाजपकडून तिकीट नाकारल्यानंतर सिलचरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तिकिटानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. दुसर्‍या टप्प्यात 39 मतदारसंघात 73,44,631 मतदार मतदान करणार आहेत. यापैकी, 37,34,537 पुरुष  36,09,959 महिला आणि 135  ट्रान्सजेंडर आहेत, असे निवडणूक आयोगाने सांगितले. 

रताबारी (एससी), पाथेरकांडी, करीमगंज उत्तर, करीमगंज दक्षिण, बदरपुर, हैलाकांडी, कॅटलिचेरा, अलगापूर, सिलचर यांसह इतर मतदार संघात असाम ची दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.  आसाममध्ये भाजपा-आसाम रिपब्लिक कौन्सिल आणि युनायटेड पीपल्स पार्टीने लिबरल्ससमवेत निवडणूक लढवत आहे, तर कॉंग्रेसच्या नेतृत्वात युतीमध्ये एआययूडीएफ, बोडोलँड पीपल्स फ्रंट आणि डावे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आसाम राष्ट्रीय पक्ष (एजेपी) आणि रायजोर दलही राज्यातील राजकीय गोंधळात ही स्पर्धा रंजक बनवत आहेत.

संबंधित बातम्या