मोदी सरकारची घटती प्रतिमा पाहता भाजपच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी संघाचा दिल्लीत खल

दैनिक गोमंतक
शनिवार, 5 जून 2021

पुढील वर्षी 2022 मध्ये  उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या 6 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन संघाने सर्व सूत्रे आपल्या हातात घेतल्याचे दिसत आहे.

नवी दिल्ली : कोरोना (Corona)  काळात सरकारची घटलेली लोकप्रियता, दिल्लीत ६ महिन्यांपासून सुरु असलेले शेतकरी आंदोलन आणि पश्चिम बंगाल मधील भाजपचा (BJP) झालेला पराभव या सर्व गोष्टी पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) स्वतः मोदी सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी मैदानात उतरला आहे. संघाची  दिल्लीतील  बैठक ही भाजपच्या भविष्यकालीन  वाटचालीसाठी  महत्वाची  मानली जात आहे. मोदी सरकारच्या मंत्री मंडळात बदलाच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. यावर देखील संघाच्या दिल्लीच्या बैठकीत खल झाल्याचे समोर येत आहे. संघाची ही बैठक म्हणजे भाजपची आगामी २०२४ च्या लोकसभा (Loksabha) निवडणुकीची  तयारी  असल्याचे बोलले जात आहे. 

पुढील वर्षी 2022 मध्ये  उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या 6 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन संघाने सर्व सूत्रे आपल्या हातात घेतल्याचे दिसत आहे. यात सर्वात महत्त्वाचे राज्य म्हणजे उत्तरप्रदेश, याकडे संघाचा प्रामुख्याने फोकस आहे. कारण उत्तरप्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखले जाते. याच राज्यातून लोकसभेवर सर्वात जास्त 80 खासदार निवडून जातात.  हे राज्य भाजपच्या हातात असेल तरच 2024 मध्ये पुन्हा दिल्लीत सत्ता मिळविणे भाजपला सोपे होऊ शकेल. त्यामुळे उत्तर प्रदेशावर संघाचे बारीक लक्ष आहे. याबाबत संघाचे बडे नेते दिल्लीत विचार मंथन करत आहेत. 

मोदी सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल मध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विषयी  तेथील जनतेमध्ये नाराजी आहे. परंतु तरी सुद्धा त्यांच्या खुर्चीला धोका नाही. पण त्यांच्या मंत्रीमंडळात मात्र फेरबदलाची चर्चा नक्कीच आहे. यात नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. तेथील पंचायत निवडणुकांत झालेल्या पराभवामुळे प्रदेशाध्यक्ष बदलाची ही जास्त शक्यता आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र यातही संघाचे मत महत्त्वाचे असेल. 

युपीनंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याबाबतही त्या राज्यातील जनतेत फार चांगले मत नाही. त्यामुळे तेथे देखील फेरबदलाची चर्चा जोरदार रंगली आहे. या  ६ राज्यांपैकी फक्त पंजाबमध्ये सध्या भाजपाची सत्ता नाही. तसेच शेतकरी आंदोलनाचे मूळदेखील पंजाबातच आहे. त्याचबरोबर तेथील भाजपचा जूना मित्र पक्ष अकाली दलाने देखील भाजपची साथ सोडली आहे. त्यामुळे इथे भाजपाला सत्तेसाठी संघर्ष करावा लागणार आहे. पंजाबमध्ये भाजपचा पाय मजबूत करण्यासाठी योग्य रणनिती करणे गरजेचे आहे. 

संबंधित बातम्या