बिहार विधानसभेत ६८ टक्के कलंकित

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

मतदानावेळी खून, मतदानकेंद्रे लुटण्यासारख्या घटनांच्या बातम्या आल्या नसल्याचे भाजपचे म्हणणे असले तरी विधानसभेचा एकूण तोंडावळा गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचाच असेल. लोकशाही सुधारणा क्षेत्रात काम करणारी एडीआर संस्था व बिहार इलेक्‍शन वॉचच्या पाहणीत बिहार हे प्रमाण वाढल्याचे दिसते. 

नवी दिल्ली : नव्या बिहार विधानसभेत २०१५ च्या तुलनेत तब्बल १० टक्के अधिक गुन्हेगार निवडून आल्याचे समोर आले आहे. विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांपैकी ६८ टक्के म्हणजे सुमारे दोन तृतीयांश आमदारांवर (१६३) गुन्हेगारी खटले दाखल आहेत. त्यातील ५१ टक्के आमदारांवर तर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, बलात्कार असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. ओवैसी यांच्या एमआयएमचे १०० टक्के तर कॉंग्रेसचे ८४ टक्के आमदार कलंकित आहेत.

दरम्यान, बिहारची नवी विधानसभा धनाढ्यांची असेल. तब्बल १९४ म्हणजे ८१ टक्के नवे आमदार कोट्यधीश आहेत. २४३ आमदारांतील प्रत्येकाचे सरासरी उत्पन्न ४ कोटी ३२ लाख रुपये आहे. अर्ज भरताना  २४१ जणांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळेच ही आकडेवारी समोर आली आहे. भाजपकडून सर्वाधिक ६५ (८९ टक्के), तर राजदचे ६४ (८७ टक्के) आमदार कोट्यधीश आहेत. 

मतदानावेळी खून, मतदानकेंद्रे लुटण्यासारख्या घटनांच्या बातम्या आल्या नसल्याचे भाजपचे म्हणणे असले तरी विधानसभेचा एकूण तोंडावळा गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचाच असेल. लोकशाही सुधारणा क्षेत्रात काम करणारी एडीआर संस्था व बिहार इलेक्‍शन वॉचच्या पाहणीत बिहार हे प्रमाण वाढल्याचे दिसते. 

एमआयएमच्या पाचही आमदारांवर गंभीर गुन्हे
एमआयएमच्या सगळ्या (१०० टक्के) म्हणजे पाचही आमदारांविरुद्ध अत्यंत गंभीर गुन्हेगारी खटले चालू आहेत. कॉंग्रेसचे १९ पैकी १६ म्हणजे (८४) तर राजदकडून ७४ पैकी ५४ (७३) टक्के गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. त्याखालोखाल भाजपचे ७३ पैकी ४७ (४७ टक्के), जदयूचे २०(४७ टक्के), भाकपचे (माओ-लेनीन) १० आमदार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांत राजद ४४, भाजप ३५, जदयू व कॉंग्रेस प्रत्येकी ११ व एमआयएमच्या पाचही आमदारांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या