'सीरम इन्स्टिट्यूट'चे अदर पुनावाला ‘एशियन ऑफ दी इयर’

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 6 डिसेंबर 2020

जगातील सर्वांत मोठी लस उत्‍पादक कंपनी असलेल्या पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना  ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

सिंगापूर :  जगातील सर्वांत मोठी लस उत्‍पादक कंपनी असलेल्या पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना  ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . कोरोनावरील लशीसाठी ‘सीरम’ने’ ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-स्वीडिश औषध कंपनी ॲस्ट्राझेनेका यांच्याशी करार केला आहे. त्यांच्या सहकार्याने ‘कोव्हिशिल्ड’ नावाने लस विकसित केली असून भारतात सध्या या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. ‘द स्ट्रेट्स टाइम्स’कडून दिल्या जाणाऱ्या ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्कारासाठी अदर पुनावाला यांच्याव्यतिरिक्त चिनी संशोधक झँग योंगझेन यांचा समावेश आहे. 

 

ज्या विषाणूमुळे कोरोनाच्या साथ जगभरात पसरली त्या ‘सार्स - सीओव्ही-२’ या विषाणूचा जिनोम  झँग यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सर्वप्रथम शोधून काढला आणि त्याची माहिती ऑनलाइन प्रसिद्ध केली होती.  चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉ. रुईची मोरिशिटा आणि सिंगापूरचे प्रा. ओई एंग इओंग यांचाही या यादीत समावेश आहे. दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांच्या कंपनीने लस तयार करून वितरणाची जबाबदारी घेतली असून त्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.

 

धैर्याला सलाम

पुरस्काराच्या मानपत्रात म्हटले की, ‘सार्स - सीओव्ही-२’ विषाणूने अनेक बळी घेतले आहेत. जनजीवन ठप्प केले. अशावेळी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आशिया खंडातील या ‘व्हायरस बस्टर्स’नी चांगले काम केले आहे. त्यांच्या धैर्याला व सर्जनशीलतेला सलाम. या अडचणीच्या काळात आशिया हा आशेचा किरण असल्याचे त्यांनी जगाला दाखवून दिले.

 

अधिक वाचा :

बळीराजा हटेना, तोडगाही निघेना पाचव्या: फेरीतील चर्चाही निष्फळ

राजस्थानातील काँग्रेस सरकारला पुन्हा ऑपरेशन लोटस चा धोका

 

 

संबंधित बातम्या