अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान

शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

देशाच्या अर्थव्यवस्थेत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे मोलाचे योगदान आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंह या सर्वच पंतप्रधानांसोबत अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.

देशाच्या अर्थव्यवस्थेत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे मोलाचे योगदान आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंह या सर्वच पंतप्रधानांसोबत अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. इंदिरा गांधींच्या काळात पहिल्यांदा अर्थव्यवस्था अडचणीत असताना देशाच्या अर्थमंत्री पदाची सूत्रे त्यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यामुळे अर्थव्यवस्थेला रुळावर येण्यास मोठी मदत झाली. 

मी पहिल्यांदा राज्याच्या विधानसभेवर निवडून आलो, त्या निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी राज्यसभेत ते पहिल्यांदा निवडून आले. संसदेत ते लोकसभा, राज्यसभेत राहिले. नंतरच्या काळात त्यांनी राष्ट्रपतिपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. केंद्र सरकारमध्ये आम्ही दोघांनी एकत्रितपणे अनेक वर्षे काम केले. नरसिंह राव, मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्याकडे अनेक मंत्रिमंडळ समूहांची जबाबदारी होती. या समूहांच्या माध्यमातून खोलात जाऊन अभ्यास करण्याची संधी मिळायची. या मंत्र्यांच्या सर्वाधिक समूहांचे अध्यक्ष हे प्रणवदा होते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे विषय कोणताही असला तरी ते सखोल तयारीनिशी यायचे. आणि आपल्या सहकाऱ्यांनाही त्याबाबत विचार करण्यास प्रोत्साहन द्यायचे. यामुळे सरकारच्या निर्णय प्रकियेला गती यायला मदत व्हायची. 

आम्ही त्यांना चालतेफिरते ज्ञानकोश म्हणायचो. एखाद्या विषयासंदर्भात सुरुवातीपासून शेवटपर्यंत सखोल व वास्तव माहिती त्यांच्याकडून ऐकायला मिळायची. स्वातंत्र्य चळवळीचा काळ असो, स्वातंत्र्याच्या अगोदर किंवा त्यानंतरचा काळ असो, प्रणवदांकडून सखोल माहिती उपलब्ध व्हायची. याशिवाय गेल्या ४० ते ५० वर्षातील केंद्र वा राज्य सरकारच्या कामकाजाची पद्धत असो, त्यांचे सखोल मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचे असायचे.

प्रणवदा-बाळासाहेब भेट
प्रणवदांच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर होती. देशातील राष्ट्रीय पक्षांशी माझे घनिष्ट संबंध होते. त्यामुळे कॉंग्रेसशिवाय अन्य राजकीय पक्ष जे भाजपसोबत नसायचे, त्या सगळ्यांची आणि प्रणवदा यांची भेट घडवून आणण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. त्या वेळी त्यांची अनेक नेत्यांशी भेट घडवून आणली होती. त्यानुसार त्यांना बाळासाहेबांच्याही घरी घेऊन गेलो होतो. त्यावेळी शिवसेना भाजपससोबत होती. मात्र माझा शिवसैनिक हा प्रणवदांच्या पाठीशी ठाम उभा राहील, अशी स्पष्ट भूमिका बाळासाहेबांनी जाहीर केली होती. प्रवणदांनीही बाळासाहेबांसोबतचा ओढा मनात कायम ठेवला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या