१० वर्षांपासून एकाच खोलीत कोंडून घेणाऱ्या भावंडांची 'करूण' कहाणी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

एकाच कुटुंबातील ३ सख्या भावंडांनी दहा वर्षे सुर्यप्रकाश पाहिला नसून गेली १० वर्षे ते आपल्याच घरात बंद आहेत. राजकोटमधील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या किसानपुरा भागातील ही तीनही भांवंडे अतिशय उच्चशिक्षित आहेत.

अहमदाबाद- गुजरातमधील राजकोटमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील ३ सख्या भावंडांनी दहा वर्षे सुर्यप्रकाश पाहिला नसून गेली १० वर्षे ते आपल्याच घरात बंद आहेत. राजकोटमधील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या किसानपुरा भागातील ही तीनही भांवंडे अतिशय उच्चशिक्षित आहेत. त्यांचे ८० वर्षीय वडीलही सेवानिवृत्त कर्मचारी असून तेच त्यांची देखभाल करत होते. 

काय आहे प्रकरण?

२७ डिसेंबर रोजी काही लोकांनी 'साथी सेवा ग्रुप' नामक संस्थेला येथील एकाच घरात एक मुलगी आणि तिचे दोन भाऊ गेली अनेक वर्षे बंद असल्याची माहिती दिली होती. ही माहिती मिळाल्यानंतर त्या संस्थेचे काही कर्मचारी त्या घरी पोहोचत त्यांनी दरवाजा तोडला. घराच्या आत शिरल्यावर तीनही भावंडे खाली झोपलेली आढळून आली. तिघांचे केस अतिशय वाढले होते. त्यांच्या अंगावर फक्त हाडेच शिल्लक असल्याचेही संबंधित संस्थेच्या निदर्शनास आले. घरात प्रचंड कचरा साचला होता. त्यानंतर संस्थेने त्यांना घराच्या बाहेर काढत त्यांचे केस कापून, नखे काढून त्यांना परिधान करण्यासाठी नवीन कपडेही दिले. 

 सेवाभावी संस्थेच्या मदतीनंतर काही वेळातच या तीनही भावंडांचे वडीलही तेथे दाखल झाले. त्यांच्याकडे याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी पुढे साऱ्या प्रकरणाबाबत इतिवृत्तांत सांगितला. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव अंबरीश असून त्याने कायद्याची पदवी (एलएलबी) घेतली आहे. राजकोट येथील कनिष्ठ न्यायालयात तो पूर्वी वकिलीही करत होता. मुलगी मेधाने राजकोट येथील कणसागरा महाविद्यालयातून मानसशास्त्राची पद्दव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. यातील सर्वांत लहान भावानेही पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून तो एकेकाळी राजकोटमध्ये खेळल्या जाणाऱ्या नाइट क्रिकेटचा आयोजकही असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्यांच्यासाठी आपणच रोज जेवण घेऊन जात असल्याचेही यावेळी वडील नवीन भाई यांनी सांगितले. 

 एवढे उच्चशिक्षीत असूनही का ओढवली ही परिस्थिती?

'मागच्या ६ वर्षांपासून माझी तीनही मुले याच परिस्थितीत घरामध्ये राहत आहेत. मी त्यांना रोज जेवण द्यायला येतो. माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर  म्हणजे त्यांची आई गमावल्यानंतर त्यांनी घराच्या बाहेर निघायचेच कमी केले. काही काळानंतर ते घरातच रहायला लागले,'असे त्यांचे वडील नवीन भाई मेहता यांनी बोलताना सांगितले.

मात्र, नवीनभाई हे अतिशय अंधश्रद्धाळू असल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. आपल्या पाल्यांवर काळ्या जादूची त्यांना नेहमी शंका येत असे. यामुळे कदाचित हळूहळू तीनही भावंडांनी घराच्या बाहेर निघणे बंद केले असावे, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या वडिलांमुळेच त्यांची ही परिस्थिती झाली अथवा ते मनोरूग्ण होते, असे प्रश्न स्थानिकांना पडत आहेत. याबाबत राजकोट पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

 

संबंधित बातम्या