कोरोनामुळे स्थिती गंभीर; सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

देशातील कोरोना स्थितीविषयीच्या याचिकेवर न्यायधीश अशोक भूषण यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. या पीठात न्यायधीश आर. एस. रेड्डी आणि एम.आर शहा यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत कोरोनाने थैमान घातले आहे. दिल्ली, आसाम, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये देखील बाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चिंता व्यक्त करत सर्व राज्यांकडून स्थिती अहवाल मागितला आहे. राज्यांनी उपाययोजनांची माहिती तातडीने सादर करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. दिल्ली सरकारसह चारही राज्यांना रुग्णवाढीबाबत फटकारले आहे. 

देशातील कोरोना स्थितीविषयीच्या याचिकेवर न्यायधीश अशोक भूषण यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. या पीठात न्यायधीश आर. एस. रेड्डी आणि एम.आर शहा यांचा समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार आणि मृतदेह याबाबत योग्य कार्यवाही होते की नाही, याची विचारणा करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले. 

दिल्लीत सध्या कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या सात दिवसात एकूण ७७७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत चालू महिन्यांत एकूण मृतांची संख्या १८७० एवढी झाली आहे. केवळ राजधानीत कोरोनामुळे आतापर्यंत ८३९१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील वाढत्या रुग्णांबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. दिल्ली सरकारची बाजू मांडताना सहायक सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी म्हटले, की रुग्णालयात खाटांची संख्या वाढवण्याबराबेरच अन्य अनेक उपाय आखले जात आहेत.  यावर देशातील कोरोनासंबंधीचा स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना मागितला. याशिवाय केंद्राकडून कोणत्या राज्यांना  आणखी किती मदत हवी आहे, याबाबतची विचारणा  केली. कोरोनाची लाट पाहता सर्व राज्यांनी सजग राहण्याची आवश्‍यकता आहे, असे न्यायालयाने  म्हटले आहे. या याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
 

संबंधित बातम्या